Sunday , September 20 2026
Breaking News

सरकारी शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा : रणजीत पाटील

Spread the love

 

खानापूर : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, तालुक्यातील अनेक सरकारी शाळांच्या इमारती जीर्ण व शिथिल झाल्या असून पावसाळ्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी अधिक प्रमाणात निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सदस्य रणजीत पाटील यांनी केले आहे
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे खानापूर तालुक्यातील माचीगड, अनगडी, हलसाल, कापोली, बिडी, बेकवाड, जुंझवाड, कारलगा, लालवाडी आदी गावांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
यावेळी मिलिंद देसाई यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्याबरोबरच वर्षभर विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली. या उपक्रमांचा विद्यार्थ्यांना चांगला लाभ होत असून, शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.
रणजीत पाटील म्हणाले की, सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाबरोबरच विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ झाले आहे. मात्र, तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्यानंतर अनेक शाळांच्या इमारतींची अवस्था चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. अनेक ठिकाणी इमारती शिथिल झाल्या असून, पावसाळ्यात छतांमधून पाणी गळती होत असल्याने विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे.
शासनाने सरकारी शाळांच्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांना सुरक्षित व चांगले शैक्षणिक वातावरण मिळेल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ॲड. अभिजित सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास राजाराम देसाई, माजी ग्रामपंचायत सदस्य आप्पाजी पाटील, अनंत देसाई, पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *