
पाककला स्पर्धेत दीपा घसारी आणि अनिशा मांगले विजेत्या
बेळगाव : श्रीमाता सोसायटीचे चेअरमन मनोहर देसाई यांच्या संकल्पनेतून गेल्या २८ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या बेळगाव श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. उद्घाटनाच्या दिवशी महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत गोड पदार्थ विभागात दीपा घसारी, तर तिखट पदार्थ विभागात अनिशा मांगले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला विधायक दिशा देणाऱ्या या फेस्टिवलचे यंदा ६ ते ९ सप्टेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी राजमाता सोसायटीच्या चेअरमन मनोरमा देसाई तसेच भक्ती सोसायटीच्या चेअरमन ज्योती अग्रवाल यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. डॉ. मीना पाटील, प्रतिभा नेगिनहाळ आणि प्राचार्या प्रेमलता पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून फेस्टिवलचे उद्घाटन करण्यात आले.
ज्योती अग्रवाल यांनी उपस्थितांचे स्वागत करून फेस्टिवलच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रतिभा नेगिनहाळ यांनी स्पर्धकांना नियमांची माहिती करून दिली. पाककला स्पर्धेसाठी रुपांजली भोसले आणि प्रतिभा माने यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
फेस्टिवलअंतर्गत पहिल्या दिवशी मिलेट्स अर्थात तृणधान्यांपासून गोड व तिखट पदार्थ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. बेळगावातील ४५ महिला स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. राळा, भगर, बाजरी, राजगिरा, नाचणी, चेना, कुठळी, कोदरा, कोराळे आणि ज्वारी आदी तृणधान्यांपासून स्पर्धकांनी विविध पौष्टिक व चविष्ट पदार्थ सादर केले.
तिखट पदार्थ विभागात अनिशा मांगले यांनी प्रथम, रश्मी भराठे यांनी द्वितीय, तर रेखा देशपांडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. गोड पदार्थ विभागात दीपा घसारी प्रथम, गीता जुवेकर द्वितीय, तर रेखा देशपांडे तृतीय ठरल्या.
गणेश फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी, सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १८ वर्षांवरील आणि १८ वर्षांखालील अशा दोन गटांत ही स्पर्धा होणार असून, स्पर्धकांनी रांगोळी घरातून आणणे आवश्यक आहे.
पाककला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन शास्त्रीनगर येथील ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत दुपारी २.३० वाजता करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta