Sunday , September 20 2026
Breaking News

उत्स्फूर्त भाषण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गाजवले वक्तृत्वाचे व्यासपीठ

Spread the love

 

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित उत्स्फूर्त भाषण स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकौशल्य, वैचारिक चिकित्सकता, सामाजिक भान तसेच संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे हा स्पर्धेचा उद्देश होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुवर्य वि. गो. साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर आपले विचार प्रभावीपणे मांडले.

‘संविधान आणि माझी जबाबदारी’, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : संधी की आव्हान?’, ‘सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणविषयक विचार’, ‘अंधश्रद्धामुक्त समाजाची गरज’, ‘व्यसनमुक्त भारत : तरुणांची भूमिका’, ‘मी बदललो तर देश बदलेल’, ‘युवकांची भूमिका’, ‘विज्ञान : वरदान की अभिशाप?’, ‘माझ्या स्वप्नातील भारत’ आणि ‘जलसंवर्धन : प्रत्येकाची जबाबदारी’ या विषयांवर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण व आत्मविश्वासपूर्ण भाषणे सादर केली.

स्पर्धेत एकूण ३९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यांच्या भाषणातून सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, विषयाचा अभ्यास आणि प्रभावी मांडणी करण्याची क्षमता दिसून आली. स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळण्याबरोबरच सार्वजनिक वक्तृत्वाचा अनुभवही मिळाला.

स्पर्धेचे परीक्षण संजीवनी खंडागळे, शैलजा मत्तीकोप आणि बी. बी. शिंदे यांनी केले. आशय, विषयाची मांडणी, भाषाशैली, आत्मविश्वास, सादरीकरण, वेळेचे भान आणि विचारांची प्रभावीता या निकषांवर स्पर्धकांचे मूल्यमापन करण्यात आले.

निकाल

प्रथम क्रमांक : अथर्व गुरव (तळसिनहाळ), गौतमी डिचोलकर (ओलमणी)
द्वितीय क्रमांक : ज्योत्स्ना जोशीलकर (कोवाड)
तृतीय क्रमांक : नागवेणी लोहार (उचगाव)

उत्तेजनार्थ :
नेहा पाटील (सुंडी), भक्ती केदणुरकर (वाघवडे), वैष्णवी गोवे (बैलूर), हर्ष पाटील (मराठी विद्यानिकेतन), पुष्पकर कोलेकर (ठळकवाडी हायस्कूल).

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इंद्रजीत मोरे, गजानन सावंत, धीरज राजपूत, सुनील लाड आणि प्रसाद सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन सावंत यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पाठ्यपुस्तकीय ज्ञानासोबतच सामाजिक प्रश्नांवर विचार करण्याची, स्वतःचे मत मांडण्याची आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी समजून घेण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. या दृष्टीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या भाषिक, वैचारिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरली.

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *