
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे स्टेअरिंगचा जॉईंट तुटल्याचा आरोप
खानापूर : खानापूर तालुक्यातील जामगाव–खानापूर बस रविवारी दि. ६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास तेरेगाळी क्रॉस ते शिरोली नाका दरम्यान रस्त्याच्या उतारावरून जात असताना रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे बस रस्त्याबाहेर गेल्याची घटना घडली. मात्र, बसचा वेग कमी असल्याने आणि चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यातील एका खड्ड्यात बस जोरात आदळल्याने स्टेअरिंगचा जॉईंट तुटला. त्यामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला वळून रस्त्याबाहेर गेली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवून ती सुरक्षितपणे थांबविली.
बसचा वेग अधिक असता तर मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
खानापूर–हेम्माडगा मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली होती. मात्र, संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, सणानिमित्त परगावी गेलेले नोकरदार तसेच पाहुणे मोठ्या संख्येने गावाकडे येत आहेत. त्यामुळे खानापूर–हेम्माडगा मार्गावरील धोकादायक खड्डे तातडीने बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta