
भगवे ध्वज, ढोल-ताशांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; शताब्दी वर्षानिमित्त वडगाव दुमदुमले
बेळगाव : शंभर वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या वडगावच्या मानाच्या राजाचा आगमन सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. विद्येचा अधिपती श्री गणरायाचा जन्म कसा झाला, हे दर्शविणारी संकल्पना यंदाच्या बाप्पाच्या मूर्तीत साकारण्यात आली असून, मूर्तीचे प्रथम दर्शन वडगावकरांसाठी डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कारभार गल्ली यंदा शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. शंभर वर्षांच्या या गौरवशाली वाटचालीच्या निमित्ताने बाप्पाचा आगमन सोहळा विशेष थाटामाटात आयोजित करण्यात आला होता. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि शहापूर पोलीस स्थानकाचे सीपीआय सीमानी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर मानाच्या राजाचे प्रथम दर्शन भक्तांना झाले.
भगवे ध्वज, ढोल-ताशांचा कडकडाट, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी आणि भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग, अशा भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात आगमन सोहळ्याला रंगत आली. सायंकाळी आठ वाजता भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली.
जेल शाळा, ३१ क्रमांकाची शाळा, येळूर रोड येथून मिरवणूक मार्गस्थ झाली. पिंपळकट्टा, पाटील गल्लीमार्गे मिरवणूक कारभार गल्लीकडे पुढे सरकली. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात अखेर मानाच्या राजाचे मंडपात दिमाखात आगमन झाले.
मिरवणुकीच्या मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आबालवृद्धांसह महिला आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. प्रत्येक चौक आणि रस्त्यावर गणरायाचा जयघोष घुमत होता. ढोल-ताशांच्या तालावर थिरकणारे तरुण, भगवे ध्वज आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण वडगाव परिसर गणेशमय झाला होता.
शताब्दी वर्षाचा उत्साह आणि मानाच्या राजाच्या भव्य आगमनाची अनुभूती घेण्यासाठी वडगावकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. आगमन सोहळ्याची भव्यता पाहून अनेकांच्या तोंडून ‘हे मुंबई किंवा पुणे नाही, तर आपले बेळगाव आहे!’ असा अभिमानाचा सूर उमटत होता.
शंभर वर्षांची परंपरा जपत नव्या पिढीचा उत्साह आणि भक्तीची सांगड घालत वडगावच्या मानाच्या राजाने शताब्दी वर्षाच्या गणेशोत्सवाचा श्रीगणेशा दिमाखात केला.

Belgaum Varta Belgaum Varta