Sunday , September 20 2026
Breaking News

शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नव्हे, तर राष्ट्रशिल्पकार! – सीमाकवी रवींद्र पाटील

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा नसून त्यांच्या विचारांना दिशा देणारा, मूल्यांची रुजवण करणारा आणि देशाची भावी पिढी घडविणारा राष्ट्रशिल्पकार आहे, असे प्रतिपादन सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले.

खानापूर तालुका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शिक्षक दिन व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. रुद्रस्वामी मठाचे प.पू. चन्नबसवस्वामी देवरू यांच्या दिव्य सान्निध्यात आणि खानापूरचे आमदार मा. श्री. विठ्ठल हालगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी क्षेत्र शिक्षणाधिकारी मा. श्री. मंजुनाथ हत्ती, पंचहमी गॅरंटी योजना खानापूरचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत कुलकर्णी, तालुका पंचायत अधिकारी श्री. रमेश मेत्री, अक्षरदासो अधिकारी श्री. विनायक जकाती यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

“बदलत्या काळात शिक्षकाची भूमिका अधिक व्यापक झाली आहे. आज विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारखी आधुनिक साधने आहेत. त्यामुळे शिक्षकाने केवळ माहिती देणारा न राहता विद्यार्थ्यांना योग्य माहितीची निवड, चिकित्सक विचार, सर्जनशीलता, मूल्ये आणि माणुसकीची जाणीव करून देणारा मार्गदर्शक बनले पाहिजे,” असे पाटील यांनी सांगितले.

अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, AI हे शिक्षकाचे स्थान घेणारे साधन नसून शिक्षकाच्या अध्यापनाला अधिक प्रभावी बनविणारे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे शिक्षकांनी काळानुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणत सतत नवनवीन ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे.
शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांच्या प्रश्नाकडेही त्यांनी लक्ष वेधले. शिक्षकांचा अमूल्य वेळ अनावश्यक अशैक्षणिक कामांमध्ये खर्च न होता तो विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी, वाचनासाठी, संशोधनासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मिळावा. शासनाने शिक्षकांना शक्य तितके अशैक्षणिक कामांपासून दूर ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी शिक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करताना परिवर्तनाचा संदेश दिला—
“शिक्षक बदलला, तर शिक्षण बदलेल;
शिक्षण बदलले, तर विद्यार्थी बदलेल;
विद्यार्थी बदलला, तर समाज बदलेल;
आणि समाज बदलला, तर राष्ट्र बदलेल!”
कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श शिक्षकांचा गौरव करण्यात आला. शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञान, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्याचा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमामुळे खानापूर तालुक्यातील निवृत शिक्षक सत्कार व प्रत्येक क्लटर मधून एक आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले .

यावेळी शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, परंपरागत मूल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रेरणादायी संदेश या शिक्षक दिन सोहळ्यातून देण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *