
बेळगाव : विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे व सातत्याने मेहनत करावी. वेळेचे महत्त्व ओळखून शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार आत्मसात करावेत. यश मिळविण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसून मेहनत, शिस्त, आत्मविश्वास, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाचीही आवश्यकता असते, असे प्रतिपादन पायोनियर अर्बन बँकेचे संचालक तथा पत्रकार अनंत लाड यांनी केले.
दि. बेळगाव तालुका रुरल इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सभासदांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा रविवारी संस्थेच्या फुलबाग गल्ली येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अनंत लाड उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मारुती सदावर होते, तर व्हाईस चेअरमन शिवाजी शहापूरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित पाहुणे व सोसायटीच्या संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. संस्थेचे व्यवस्थापक विनायक गोदे यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी अध्यक्षांच्या हस्ते अनंत लाड यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
आजचा हा सत्कार केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक नसून भविष्यात आणखी मोठी कामगिरी करण्यासाठी त्यांना मिळालेली प्रेरणा आहे, असे सांगून अनंत लाड यांनी विविध क्षेत्रांत यश संपादन केलेल्या मान्यवरांची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवली.
यानंतर पाहुणे व संचालकांच्या हस्ते सभासदांच्या गुणवंत मुलांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. शाखा व्यवस्थापक मोहन सनदी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांची यादी सादर केली.
यावेळी सोसायटीचे संचालक कृष्णा मोदगेकर, रमेश मोदगेकर, मिलिंद पावशे, मल्लाप्पा चौगुले, रघुनाथ पाटील, उदय किल्लेकर, किसन रेडेकर तसेच श्रीमती निर्मला कामुले व श्रीमती नंदा बिरजे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनायक गोदे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी संस्थेचे अनेक सभासद व त्यांची मुले उपस्थित होती.

Belgaum Varta Belgaum Varta