
बेळगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिक्षेपक, साउंड सिस्टिम, मिरवणुका, वाहतूक व्यवस्था तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिला. उत्सव काळात लेसर लाईटच्या वापरावर पूर्णपणे बंदी राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पोलिस प्रशासनातर्फे सोमवारी (ता. ७) कुमार गंधर्व रंगमंदिर येथे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी विविध शासकीय खात्यांचे अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या नियमांचे प्रत्येक मंडळाने काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे सांगताना पोलिस आयुक्त निकम म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ध्वनिक्षेपकांचा वापर, साउंड सिस्टिम, मिरवणुका आणि वाहतूक व्यवस्थेबाबतच्या नियमांचे उल्लंघन कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही.
उत्सवादरम्यान मंडळांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी अथवा पोलिस प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. मंडळांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन आवश्यक ते सहकार्य करेल; मात्र कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार अथवा नियमभंग खपवून घेतला जाणार नाही, असेही निकम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी गणेशोत्सव जवळ आला असतानाही काही ठिकाणी तयारी अपूर्ण असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. मंडळांच्या कार्यकर्त्यांवर विनाकारण गुन्हे दाखल होणार नाहीत, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मंडळांनी उत्सवाबरोबरच रक्तदान शिबिरे आणि समाजप्रबोधनपर उपक्रम राबवून विधायक कार्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
साउंड सिस्टिम आणि फटाक्यांबाबत जनजागृती
उच्च आवाजातील साउंड सिस्टिम आणि फटाक्यांमुळे कान व डोळ्यांना होणाऱ्या संभाव्य इजांबाबत जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. श्रुती व्ही. एस. आणि डॉ. ज्योतिकुमार पत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गणेशोत्सव मंडळांनीही यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
बैठकीस पोलिस उपायुक्त नारायण बरमणी, महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्यासह रणजित चव्हाण-पाटील, विकास कलघटगी, सागर पाटील, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक रवी साळुंके, रमेश सोटंकी, गणेश दड्डीकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta