
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन; 4 कोटींचा निधी मंजूर
कुद्रेमानी (प्रतिनिधी) : बेळगाव ग्रामीणच्या आमदार तथा कर्नाटक राज्याच्या माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मीताई आर. हेब्बाळकर यांच्या आमदार निधीतून मंजूर झालेल्या कुद्रेमानी–सोनोली रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी कुद्रेमानी येथे उत्साहात झाला. मंत्री हेब्बाळकर यांनी विधिवत पूजन करून कुदळ मारत या विकासकामाचा प्रारंभ केला.
यावेळी मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचे विनायक नारायण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांचे दीपक पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रवि पाटील यांनी कुद्रेमानी गावातील पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकासाची मागणी केली. कुद्रेमानी ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रा उत्सव 2028 मध्ये होणार असल्याने गावाचा विकास ‘स्मार्ट व्हिलेज’च्या धर्तीवर करण्यात यावा. तसेच हरिजन समाजासाठी मंदिर व भवन उभारण्यात यावे व रोजगार हमी योजनेचे रक्कम मिळावी अशी मागणी त्यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली.
यावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, “शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कुद्रेमानी ते सोनोली रस्त्यासाठी ₹ 4 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे शेतकरी तसेच ऊस वाहतूकदारांची मोठी सोय होणार आहे.”
यासोबतच हनुमान मंदिर उभारणीसाठी ₹ 2 कोटी, रामघाट रस्ता–पट्टेबसोडी नाल्यावर पूल बांधण्यासाठी ₹40 लाख, श्रीराम मंदिर बांधकामासाठी ₹30 लाख तसेच गुरव नगरातील काँक्रीट रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“२०२८ च्या महालक्ष्मी यात्रेपूर्वी कुद्रेमानीचा चेहरामोहरा बदलणार” – आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी दिला ग्रामस्थांना शब्द
“कुद्रेमानी गावाची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रा 2028 मध्ये होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावाचा चेहरामोहरा बदलून रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा आणि 24 तास वीज उपलब्ध करून देत कुद्रेमानीचा सर्वांगीण विकास करण्यात येईल.” मा.मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या या घोषणेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास कुद्रेमानी काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरुण देवण, पिंट्यू कागणकर, बाळाराम कदम, शंकर पाटील, धोंडिबा पाटील, सुरेश पाटील, मनोहर बेळगावकर, शिवाजी गुरव, संजय राजगोळकर, परशराम काकतकर, गावडू संभाजी पाटील, संजय पन्हाळकर , रवळू देवण, काशिनाथ देवण, बबन गुरव, दतु वैजू पाटील, विमल विलास साखरे, शुभांगी राजगोळकर, बाळाराम पाटील, निलेश पाटील, सखूबाई सुतार, अश्विनी देवणाप्पा कागणकर, रेणूका नाईक, कमळाबाई गोविंद हरिजन, शंकर गोपाळ पाटील, अर्जुन मुरकुटे, अनंत बडसकर, शटुप्पा पाटील, संजय कांबळे, महादेव पाऊसकर, रामलिंग पाटील, गोविंद बडसकर, सागर पाटील, मनोहर लोहार, यल्लाप्पा काकतकर, संभाजी पाटील, लक्ष्मण राजगोळकर, वनिता प्रकाश गुरव, शालन मारुती बोकमूरकर, रेणुका मजूकर, वनिता कांबळे, गणपत बडसकर, तुकाराम बडसकर, गोविंद कांबळे, वामन कांबळे, विठ्ठल कांबळे, परशराम कांबळे, लकाप्पा कांबळे, लक्ष्मण जानबा कांबळे, मारुती नाईक, आप्पाजी नाईक, यल्लाप्पा नाईक, वैजनाथ तरवाळ, ईश्वर नाईक, कुंडयेकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी शंकर पाटील यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta