
खानापूर प्रतिनिधी : खानापूर–लोंढा मार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ मंगळवारी (दि. ८) रात्री दुचाकी आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होऊन युवराज शत्रुघ्न माळिक (वय ३०, रा. जटगे) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी मोहिनी युवराज माळिक (वय २५) गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
युवराज व मोहिनी माळिक हे खानापूरहून जटगे गावाकडे दुचाकीवरून जात असताना माणिकवाडी क्रॉसजवळ समोरून येणाऱ्या ट्रकशी त्यांची जोरदार धडक झाली.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एल. एच. गोवंडी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मोहिनी यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर युवराज यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.
या प्रकरणाची नोंद खानापूर पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे जटगे गावात शोककळा पसरली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta