
वैज्ञानिक निकषांवर होणार निवड; दुसऱ्या टप्प्यातील संभाव्य तालुक्यांची यादी केंद्राकडे पाठविण्याची तयारी
बेळगाव : राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. वैज्ञानिक निकषांच्या आधारे दुष्काळग्रस्त तालुक्यांची निवड केली जात असून, पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या १०१ तालुक्यांनंतर आता दुसऱ्या टप्प्यातील संभाव्य तालुक्यांची यादीही केंद्र सरकारला सादर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
वैज्ञानिक अहवालानुसार राज्यातील तब्बल १२८ तालुक्यांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नसून, अनेक ठिकाणी पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. साधारणपणे एखाद्या भागात सलग तीन आठवडे पाऊस न झाल्यास तेथे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे वैज्ञानिक निकषांनुसार मानले जाते. या निकषांसह पावसाचे प्रमाण, पिकांची स्थिती, पिकांचे नुकसान आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात १०१ तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही अनेक तालुक्यांमध्ये पावसाची स्थिती समाधानकारक नसल्याने उर्वरित पात्र तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा सामना करणाऱ्या तालुक्यांचाही समावेश होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील यादी महिनाअखेरीस निश्चित होण्याची शक्यता असून, दुष्काळग्रस्त तालुक्यांची एकूण संख्या १८० ते २०० पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील पावसाची प्रत्यक्ष स्थिती, खरीप पिकांचे झालेले नुकसान आणि उपलब्ध पाणीसाठा यांचे मूल्यांकन करून पात्र तालुक्यांचा यादीत समावेश करण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यात घोषित करण्यात आलेल्या १०१ दुष्काळग्रस्त तालुक्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीच्या माध्यमातून मदत देण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील तालुक्यांचा समावेश करून त्यांचा एकत्रित अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्याची तयारीही सुरू आहे.
बेळगाव जिल्ह्यातील पावसाची स्थिती आणि शेतीवरील परिणाम लक्षात घेता, दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील पात्र तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीत स्थान मिळते का, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta