
१४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांत रंगणार दोन दिवस कबड्डीचा थरार
राजगोळी बु. (प्रतिनिधी) : चंदगड तालुका शासकीय कबड्डी क्रीडा स्पर्धेचा शानदार शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, राजगोळी बु. येथे उत्साहपूर्ण आणि क्रीडामय वातावरणात झाला. सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील विविध शाळांमधून आलेल्या खेळाडूंच्या उत्साहामुळे स्टेडियम परिसरात चैतन्य निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज शिक्षण संस्था, राजगोळी बु.चे अध्यक्ष बी. के. पाटील होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सीमाकवी रवींद्र पाटील यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना रवींद्र पाटील म्हणाले, “क्रीडा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रभावी साधना आहे. खेळातून शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित होते. विजय मिळविणे महत्त्वाचे आहेच; मात्र विजयापेक्षा खिलाडूवृत्ती जपणे आणि पराभवातून शिकणे अधिक महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करावी.”
चंदगड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष व्ही. एस. पाटील व खजिनदार एन. टी. बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री दत्त हायस्कूल, राजगोळी बु. हे स्पर्धेचे संयोजक आहेत. मुख्याध्यापक आनंद पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. क्रीडा विभाग प्रमुख एस. ए. पाटील यांनी स्पर्धेच्या आयोजनाची माहिती दिली.
१४ वर्षांखालील मुलांचे २० संघ मैदानात
छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे १४, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या कबड्डी स्पर्धा दोन दिवस रंगणार आहेत. विशेषतः १४ वर्षांखालील मुलांचे तब्बल २० संघ स्पर्धेत सहभागी झाले असून, विविध वयोगटांतील संघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. तालुक्यातील विविध शाळांमधून आलेल्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे दर्शन घडवित मैदानावर उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.
यावेळी क्रीडा शिक्षक व संघ व्यवस्थापक पी. जे. बोकडे , तानाजी पाटील, आर. पी. पाटील, नरेंद्र हिशोबकर, एस. के. गावडे, एल. ए. कांबळे, पार्ले हायस्कूलचे गावडे सर, धुरी सर, व्ही. एम. बारड सर यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक, संघ व्यवस्थापक व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
स्पर्धेतील सामन्यांचे पंच म्हणून भरत पाटील, रामदास पाटील व अविनाश पाटील यांनी जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एस. गुरव सर यांनी केले, तर एस. के. पाटील यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांच्या दमदार चढाया, पकडी आणि गुणांसाठीची रंगणारी चुरस यामुळे पुढील दोन दिवस राजगोळी बु. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर कबड्डीचा थरार अनुभवायला मिळणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta