चंदगड : तिलारी घाटातील प्रेशर पॉईंट परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या खुनाचे गूढ अखेर उलगडले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अत्यंत शिताफीने तपास करत कर्नाटकातील तिघा आरोपींना अटक केली आहे. मयत महिलेची ओळखही सुरुवातीला अज्ञात असताना आणि तपासासाठी फारसे धागेदोरे नसतानाही पोलिसांनी केलेल्या तांत्रिक व बारकाईच्या तपासामुळे हा गुन्हा प्रकाशझोतात आला.
२९ मे २०२६ रोजी सकाळी तिलारी घाटातील प्रेशर पॉईंटजवळ एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालातून डोक्यावर झालेल्या गंभीर मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चंदगड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवली.
तपास पथकाने घटनास्थळी मिळालेल्या कपडे, दागिने आणि इतर पुराव्यांच्या आधारे महिलेची ओळख पटविण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली. कोल्हापूर, सिंधुदुर्ग तसेच कर्नाटकातील बेपत्ता महिलांची माहिती तपासण्यात आली. त्याचबरोबर तिलारीनगर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले.
अखेर पोलिसांनी मयत महिलेची ओळख गंगवा सत्याप्पा हंचीमनी (वय २५, रा. वंटमुरी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) अशी पटवली. यानंतर तपासाला वेग आला. २५ मे रोजी तिलारी घाटातून गेलेल्या एका इको कारचा मागोवा घेत पोलिसांनी तब्बल ११० किलोमीटर परिसरातील विविध सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण केले.
या तपासातून बसवराज चेल्लप्पा करणावर (वय ३३, रा. राजकोटे, ता. हुक्केरी) याच्यापर्यंत पोलिस पोहोचले. चौकशीदरम्यान त्याने चेल्लप्पा करणावर (वय ५७) आणि लक्ष्मण अंकली (वय ३७, रा. केनवट्टी, ता. हुक्केरी) यांच्या मदतीने गंगवा हंचीमनी हिचा खून करून मृतदेह तिलारी घाट परिसरात फेकल्याची कबुली दिली. त्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या उल्लेखनीय कारवाईत पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, चंदगड पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक कोळेकर, विजय इंगळे, समीर कांबळे, सागर चौगुले आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.
तिलारी घाटातील या खळबळजनक खूनप्रकरणाचा उलगडा झाल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली असून, अत्यल्प धागेदोऱ्यांवरून आरोपींपर्यंत पोहोचलेल्या पोलिसांच्या तपास कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta