
‘मुख्यमंत्री विद्यार्थी सहाय्य हस्त’ योजनेचे अर्ज पोर्टल सुरू; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
बेंगळुरू : ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे स्पर्धा परीक्षांच्या तयारीपासून वंचित राहावे लागू नये, तसेच त्यांना सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उच्च शिक्षण खात्याच्या वतीने ‘मुख्यमंत्री विद्यार्थी सहाय्य हस्त’ ही मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे पोर्टल उच्च शिक्षण मंत्री बसवराज राय रेड्डी यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.
या योजनेंतर्गत पात्र प्रशिक्षण केंद्रांची निवड करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लवकरच प्रशिक्षणाला सुरुवात होणार असून, सुमारे ९ कोटी रुपयांचा निधी खर्च करून तब्बल ९० हजार विद्यार्थ्यांना तीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
योजनेमध्ये कर्नाटक लोकसेवा आयोग (केपीएससी) आणि कर्नाटक परीक्षा प्राधिकरण (केईए) यांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त तीन परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
अभ्यास साहित्यापासून शंका निरसनापर्यंत सुविधा
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले दर्जेदार आणि सर्वसमावेशक मार्गदर्शन मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षणामध्ये अभ्यास व्यवस्थापन प्रणाली, अभ्यास साहित्य, ऑनलाइन वर्ग, सराव परीक्षा तसेच शंका निरसन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी सेवा सिंधू पोर्टल, ग्राम वन केंद्र तसेच मोबाईलच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा सहज लाभ घेता येणार आहे.
आर्थिक परिस्थितीमुळे महागडे खासगी प्रशिक्षण घेणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असून, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी सेवेत प्रवेश मिळविण्याची संधी अधिक व्यापक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Belgaum Varta Belgaum Varta