
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निकटवर्तीय व नातेवाईकांच्या निवासस्थाने आणि कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेली दीर्घ शाेधमोहीम अखेर संपली. गुरुवारी मंत्री सतीश जारकीहोळी आपल्या निवासस्थानातून बाहेर पडताच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
बेंगळूर, बेळगाव, गोकाक आणि गोवा यासह १५ हून अधिक ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून एकाच वेळी शोधमोहीम सुरू केली होती. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत विविध ठिकाणी कागदपत्रे व आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान रोकड, सोन्याचे दागिने, स्थावर-जंगम मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, विविध गुंतवणुकींची माहिती तसेच संशयित आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, जप्त करण्यात आलेल्या वस्तू व कागदपत्रांचा अधिकृत तपशील ईडीच्या निवेदनानंतरच स्पष्ट होणार आहे.
मंत्री जारकीहोळी यांचे नातेवाईक वाय. मंजुनाथ तसेच निकटवर्तीय धरगशेट्टी, नरसण्णावर, डॉ. सोनवाळकर आणि मलगौडा पाटील यांच्या निवासस्थानीही ईडीकडून चौकशी व झडती घेण्यात आली.
गोकाक येथील हिल्स गार्डन परिसरातील निवासस्थानी इंडियन बँकेचे कर्मचारी मोठ्या पेट्या घेऊन दाखल झाले होते. तेथे बँक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, बेंगळूर, बेळगाव आणि गोकाक येथील तपासणीची कारवाई गुरुवारी सायंकाळपर्यंत पूर्ण झाली. कारवाईनंतर सतीश जारकीहोळी निवासस्थानातून बाहेर पडताच उपस्थित समर्थकांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. ईडीच्या अधिकृत निवेदनानंतर या कारवाईतील जप्ती आणि तपासाची नेमकी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Belgaum Varta Belgaum Varta