
खानापूर : खानापूर तालुक्यातील विकासकामांवरून काँग्रेसच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी विद्यमान भाजप आमदार विठ्ठल हलगेकर यांना थेट आव्हान दिल्याने तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “तुम्ही कागदपत्रे घेऊन या, मीही कागदपत्रे घेऊन येते. गेल्या तीन वर्षांत तालुक्यासाठी नेमके कोणी आणि किती काम केले, याचा हिशेब जनतेसमोर मांडूया,” असे आव्हान त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले.
डॉ. निंबाळकर यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामांची आकडेवारी मांडत सध्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नगरपंचायत, स्लम बोर्ड तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील घरकुल योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या तीन वर्षांत तालुक्यात एकही घरकुल मंजूर झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. घरकुलाच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे घेतले जात असल्यास सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
कुसमळी प्रकल्पावरूनही त्यांनी आमदारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. या प्रकल्पाला २०२४ मध्ये मंजुरी मिळाली असून २०२५ मध्ये वर्क ऑर्डर निघाल्याचे सांगत, या कामाचे श्रेय आपल्याला देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय स्थानिक कंत्राटदारांना डावलून बाहेरील कंत्राटदारांना कामे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ऊसतोडणीमध्ये पक्षपात होत असल्याचा दावा करत मराठी-कन्नड असा भेद न करता सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली.
अवरोळी येथील १४१ एकर गायरान जमिनीच्या कथित गैरव्यवहाराचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन मठाच्या नावावर करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेला नगरसेवक तोहीद चांदखन्नवर, केपीसीसी सदस्य महादेव कोळी, महिला अध्यक्ष सावित्री मादार, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महांतेश राऊत आणि युवा अध्यक्ष साईश सुतार उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta