
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी ‘नाटक हे मराठी भाषा शिकविण्याचे प्रभावी माध्यम आहे’ या विषयावर विशेष शिक्षक कार्यशाळेचे आयोजन बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे करण्यात आले होते. शिक्षकांनी नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी भाषा अधिक प्रभावी, आनंददायी आणि कृतीशील पद्धतीने शिकवावी, हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
कार्यशाळेत नाट्यकलेचा शैक्षणिक प्रक्रियेत प्रभावी वापर, संवादफेक, अभिनय, भूमिकानाट्य, कथानकाच्या माध्यमातून भाषाशिक्षण, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे तसेच नाटकाच्या माध्यमातून शब्दसंपदा, उच्चार, संभाषणकौशल्य आणि सर्जनशीलता विकसित करण्याच्या विविध पद्धतींवर मार्गदर्शन करण्यात आले.
पारंपरिक पद्धतीपेक्षा कृती, अभिनय आणि संवादाच्या माध्यमातून भाषा शिकवल्यास विद्यार्थ्यांचा विषयातील रस वाढतो. नाटकामुळे विद्यार्थ्यांना भाषा केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष अनुभवता येते. त्यामुळे मराठी भाषा अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी नाट्यकलेचा वापर करणे आवश्यक असल्याचे कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आले.
या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी नीला आपटे, सविता पवार, बी. जी. पाटील, नारायण उडकेकर आणि धीरज सिंह राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
शिक्षकांसाठी आयोजित या कार्यशाळेमुळे मराठी भाषा अध्यापनाला नवी दिशा मिळून नाटकासारख्या सर्जनशील माध्यमाचा वर्गातील वापर वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta