
बेळगाव : सण-उत्सव भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून, ते आनंद, बंधुभाव आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देतात. मात्र, सण साजरे करताना ध्वनिप्रदूषण व पर्यावरणाची हानी टाळण्याचे आवाहन मराठी विद्यानिकेतन, बेळगावच्या वतीने करण्यात आले.
‘डॉल्बीमुक्त व पर्यावरणपूरक सण साजरे करूया’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली. यावेळी जनजागृती पत्रकांचे वाटप करून डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजामुळे होणारे ध्वनिप्रदूषण तसेच त्याचा विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि पशुपक्ष्यांवर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली.
तसेच सणांच्या काळात प्लास्टिकचा वापर टाळावा, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे, पाणी व वीज बचत करावी आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता उत्सव साजरे करावेत, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नागरिकांशी संवाद साधत ‘सण आनंदाचा, पर्यावरण संरक्षणाचा’ आणि ‘डॉल्बीला नकार, शांततामय उत्सवाचा स्वीकार’ असे संदेश दिले.
डॉ. शिवाजीदादा कागणीकर, सुभाष ओऊळकर आणि नीला आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. नारायण उडकेकर, बी. जी. पाटील, सविता पवार यांच्यासह शाळेतील शिक्षकांनी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
नागरिकांनीही उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत ध्वनिप्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संकल्प व्यक्त केला. सणांचा खरा आनंद मोठ्या आवाजात नसून प्रेम, आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाच्या सहवासात आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
‘आनंदाने सण साजरा करूया; पण निसर्ग आणि समाजाचे भान ठेवूया!’ या संदेशाने जनजागृती उपक्रमाची सांगता झाली.

Belgaum Varta Belgaum Varta