
बेळगावी : श्री सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ, शहापूर यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या एक खिडकी परवानगी प्रक्रियेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी शहापूर पोलीस ठाण्यात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली.
यावेळी पोलीस अधिकारी, केईबी (HESCOM), महानगरपालिका तसेच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी प्रक्रियेबाबत माहिती घेण्यात आली. शहापूर परिसरातील एकूण ९१ सार्वजनिक गणेश मंडळांपैकी ६३ मंडळांनी आवश्यक परवानगी घेतली असून, उर्वरित २८ मंडळांची परवानगी प्रक्रिया येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परवानगी देण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने व सुरळीतपणे सुरू असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रांसह परवानगी प्रक्रिया वेळेत पूर्ण करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी श्री सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, उपाध्यक्ष अशोक चिंडक, सचिव मंगेश नागोजी तसेच सदस्य हिरालाल चव्हाण, निखिल मासेकर, संदीप जाधव, प्रकाश सामंत, संजय चौगुले, ओंकार खन्नूकर, रितेश चिंडक आणि केशव शर्मा उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta