
७०० रोपट्यांतून उभा राहणार ‘हरित’ संकल्प!
बेळगाव : पर्यावरणाचा ढासळता समतोल, वाढते प्रदूषण आणि बदलत्या हवामानाचे गंभीर परिणाम पाहता वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता न राहता लोकचळवळ बनणे गरजेचे आहे. रोपटे लावणे सोपे; मात्र त्याला जगवून वृक्षरूप देणे ही खरी पर्यावरणसेवा आहे, या भावनेतून अलायन्स क्लब्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट १३१ने ७०० रोपट्यांच्या संगोपनाचा हरित संकल्प केला आहे.
हिरेबागेवाडी येथील राणी चन्नम्मा विद्यापीठालगतच्या डोंगर परिसरात अलायन्स क्लब्स इंटरनॅशनलच्या वतीने मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. अलायन्स क्लब ऑफ वेणुग्राम आणि अलायन्स ग्रुप ऑफ जी. जी. चिटणीस यांच्या प्रमुख सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात काजू आणि आंब्याच्या २२० रोपट्यांची लागवड करण्यात आली.
या प्रकल्पाअंतर्गत एकूण ७०० रोपट्यांची लागवड करून त्यांचे वर्षभर संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. केवळ वृक्षारोपण करून उपक्रमाची सांगता न करता नियमित पाणीपुरवठा, सेंद्रिय खतांचा वापर आणि आवश्यक देखभाल करून प्रत्येक रोपटे जोमाने वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. लावलेल्या रोपट्यांचे भविष्यात मोठ्या वृक्षांमध्ये रूपांतर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी माहिती मदन बामणे यांनी दिली.
‘रोप लावा आणि विसरू नका; त्याला जगवा!’
अलायन्स क्लब्स इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बालाजी शास्त्री यांनी पर्यावरण संवर्धनासाठी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीची गरज व्यक्त केली.
ते म्हणाले, वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणासमोरील संकटे ही भविष्यासाठी गंभीर इशारा देणारी आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याबरोबरच लावलेल्या रोपट्यांचे संगोपन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एक रोपटे म्हणजे भविष्यातील सावली, प्राणवायू आणि पर्यावरणीय संतुलनाची हमी आहे. त्यामुळे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.
या कार्यक्रमास अलायन्स क्लब्स इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बालाजी शास्त्री, डिस्ट्रिक्ट १३१च्या माजी प्रांतपाल व आंतरराष्ट्रीय संचालिका डॉ. नवीना शेट्टीगार, अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामच्या अध्यक्षा राजश्री हसबे आणि उपप्रांतपाल रमेश हेडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री अम्मा भगवान सेवा समितीच्या सदस्यांनीही या पर्यावरणपूरक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
वृक्षारोपण उपक्रमासाठी मदन बामणे, आर. एम. चौगुले, डॉ. सविता देगीनाळ, डॉ. नवीना शेट्टीगार, मानसी चौगुले, भाग्यश्री कालकुंद्रीकर आणि ॲड. दिनकर शेट्टी यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी सुधाकर चौगुले, नितीन कदम, पुरुषोत्तम हसबे, राम गुरव, दीपा आजरेकर, मधुरा गुरव, दीपा सांबरेकर, आनंद गोकावी, महेश चौगुले, रेखा बामणे, विद्या सरनोबत, दिपाली देसाई, प्रीती चौगुले, प्रदीप गट्टी आणि मल्लवा गोकावी आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta