
ऊस उत्पादनवाढीसाठी नवतंत्रज्ञानाचा घेतला प्रत्यक्ष अभ्यास
कुद्रेमानी : ऊस उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनवाढ साधण्यासाठी कुद्रेमानी येथील प्रगतशील शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आष्टा येथे सुरू असलेल्या ‘गन्ना मास्टर ऊस जत्रा २०२६’ प्रदर्शनाला भेट देऊन विविध तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास केला.
शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी रवि पाटील, विजय पाटील, बाळाराम कदम, जोतिबा बडसकर, सुरेश पाटील व तानाजी पाटील यांनी ऊस प्लॉटची पाहणी केली.
यावेळी २६५, १००१ व ८६०३२ या ऊस जातींचे डेमो प्लॉट पाहण्याची संधी मिळाली. विशेषतः ८६०३२ या जातीपासून अधिक उत्पादन मिळण्याची शक्यता असल्याचे यावेळी अभ्यासातून जाणवले.
प्रदर्शनात चार फूट सरी व दोन फूट अंतरावर रोप, पाच फूट सरी व दीड फूट अंतरावर रोप तसेच सात फूट सरी व एक फूट अंतरावर रोप अशा विविध लागवड पद्धतींची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तसेच ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन, औषधांचा योग्य वापर आणि पीक व्यवस्थापनाच्या माध्यमातून एकरी १०० टनांपर्यंत ऊस उत्पादन घेण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती गन्ना मास्टर प्रमुख अंकूश जालिंदर चोरमुले यांनी शेतकऱ्यांनी सांगितली.
यावेळी विजय पाटील यांनी बैलूर येथे ‘गन्ना मास्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करून पाच फूट सरी पद्धतीने केलेल्या ऊस लागवडीचा अनुभव सांगितला. योग्य औषध व खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन वाढीस निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
योग्य जातीची रोपे, सरीतील अंतर, ठिबक सिंचन, विद्राव्य खतांचा वेळोवेळी ढोस व ऊस लागवड करताना करताना स्थानिक हवामानाचा विचार करणे गरजेचे आहे.
“शेतकऱ्यांनी नव्या दिशेने वाटचाल करत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड शेतीला दिली, तर उत्पादनवाढीसोबतच शेती अधिक किफायतशीर होऊ शकते. अशा ऊस जत्रा व प्रात्यक्षिक प्रदर्शनांमधून शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करता येतो. त्यामुळे ही प्रदर्शने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक अभ्यासकेंद्रे ठरतात,” असे मत रवि पाटील यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta