Sunday , September 20 2026
Breaking News

घराचे घरपण होतीस तू आई…आमची गृहलक्ष्मी होतीस तू आई…

Spread the love

 

तुझे अचानक जाणे आम्हाला पोरके करून गेले…
तुझ्या आठवणींचा सुगंध मात्र सदैव आमच्या मनात दरवळत राहील.

कै. शांता गुंडू पाटील यांचे दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले. आज त्यांच्या निधनाचा अकरावा दिवस. त्यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

‘जो आवडे सर्वांना, तोची आवडे देवाला’ असे म्हणतात. कै. शांता यांच्या बाबतीतही हेच काहीसे घडले. आयुष्याच्या संध्याकाळी सुखाचे क्षण अनुभवत असतानाच त्यांचे अचानक जाणे संपूर्ण कुटुंबाच्या मनाला चटका लावून गेले.

वयाच्या ७८व्या वर्षीही त्यांचा उत्साह आणि कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी तरुण महिलांनाही प्रेरणा देणारी होती. घराचा आधारवड म्हणून त्यांनी आयुष्यभर कुटुंबाची जबाबदारी खंबीरपणे पेलली. तरुण वयातच मुलाचे अचानक निधन झाले. त्याच काळात पतीचेही छत्र हरपले. मात्र या आघातांनी त्या खचल्या नाहीत. न डगमगता त्यांनी संसाराचा गाडा गृहलक्ष्मी म्हणून समर्थपणे हाकला.

आपली सून हाच आपला मुलगा मानून त्यांनी तिला आयुष्यभर भक्कम आधार दिला. कधी आई, कधी वडील, कधी सासू, तर कधी सासऱ्याची भूमिका निभावत त्यांनी सुनेला मार्गदर्शन केले. शेतीची जबाबदारी असो किंवा घराचा कारभार, त्यांनी प्रत्येक जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

उत्तम स्वयंपाक करणे, घर स्वच्छ ठेवणे, पै-पाहुण्यांचा प्रेमाने पाहुणचार करणे, प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करणे, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. नेहमी हसतमुख राहणे आणि प्रत्येकाशी प्रेमाने बोलणे, यामुळे त्या सर्वांच्या मनात आपलेपणाचे स्थान निर्माण करून गेल्या.

आयुष्यात अनेक संकटे आली; मात्र प्रत्येक संकटाला त्यांनी खंबीरपणे सामोरे जात आपल्या सुनेच्या आणि मुलींच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. आपल्या नातींच्या विवाहासाठीही त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. पुढे घरात नातवंडे, पणतवंडे यांची लगबग सुरू झाली आणि त्यांचे घर खऱ्या अर्थाने गोकुळ बनले. या सुखाचे क्षण त्यांनी मनापासून अनुभवले.

मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना केवळ ताप येण्याचे निमित्त झाले आणि त्यानंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली.

आई, तुझ्या आठवणी सदैव आमच्या सोबत राहतील. तुझ्या मायेची ऊब, तुझा प्रेमळ स्वभाव आणि तुझे संस्कार आमच्या आयुष्याला कायम मार्गदर्शन करत राहतील. तुझे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

तुझ्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो…
हीच भावपूर्ण श्रद्धांजली!

— पत्रकार राधिका सांबरेकर

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *