Sunday , September 20 2026
Breaking News

बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा संपली; आजपासून भक्तिमय पर्वाला प्रारंभ

Spread the love

 

तिथी वृद्धीमुळे यंदाचा गणेशोत्सव बारा दिवसांचा; हरतालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी

बेळगाव : विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा अखेर संपली असून, सोमवार (दि. १४) पासून भक्ती, उत्साह आणि आनंदाने भारलेल्या गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी शहरातील घराघरांत तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये जय्यत तयारी पूर्ण झाली असून, बाप्पाच्या आगमनाने पुढील बारा दिवस बेळगाव भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. यंदा तिथी वृद्धी झाल्याने गणेशोत्सवाचा कालावधी बारा दिवसांचा राहणार असून, उत्सवाच्या आनंदात एका दिवसाची भर पडली आहे.

सामान्यतः भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सवाचा कालावधी अकरा दिवसांचा असतो. मात्र यंदा तिथी वृद्धीमुळे हा कालावधी बारा दिवसांचा झाला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना यंदा बाप्पाच्या आराधनेसाठी अतिरिक्त एक दिवस लाभणार आहे.

हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी

यंदाच्या गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हरतालिका पूजन आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आली आहे. दोन्ही व्रतांचे कर्ते भिन्न असल्याने हरतालिका पूजन आणि श्री गणेशाची प्रतिष्ठापना यापैकी कोणतीही पूजा आधी किंवा नंतर करण्यास धार्मिकदृष्ट्या अडचण नसल्याचे जाणकारांचे मत आहे.

अखंड सौभाग्य लाभावे आणि मनासारखा पती मिळावा, या भावनेतून कुमारिका व सुहासिनी हरतालिकेचे व्रत करतात. तर श्री गणेशोत्सव हा भक्तीबरोबरच एकता, बंधुता, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा उत्सव म्हणून साजरा केला जातो.

गणेशोत्सवातील प्रमुख दिवस

– सोमवार, दि. १४ सप्टेंबर : श्री गणेश आगमन व प्रतिष्ठापना
– मंगळवार, दि. १५ सप्टेंबर : ऋषिपंचमी
– गुरुवार, दि. १७ सप्टेंबर : ज्येष्ठा गौरी आवाहन
– शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर : ज्येष्ठा गौरी पूजन
– शनिवार, दि. १९ सप्टेंबर : मूळ नक्षत्रावर गणपती-गौरी विसर्जन
– शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर : भाद्रपद शुक्ल चतुर्दशी अर्थात अनंत चतुर्दशी

बारा दिवस भक्तीचा जागर

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेला गणराया हा केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून, कला, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचा उत्सव आहे. त्यामुळे पुढील बारा दिवस शहरातील घराघरांत गणरायाची आराधना, मंगलमय आरत्या, भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण आधीच उत्साहाने भारले असून, सोमवारपासून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने बेळगावनगरी दुमदुमणार आहे. भक्तांच्या श्रद्धेला उत्साहाची जोड मिळत बाप्पाच्या आगमनाने शहराला भक्ती आणि मांगल्याचे नवे रूप लाभणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *