







पिकांवर किडीचा प्रादुर्भाव, खर्चही वसूल होण्याची चिंता
बेळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील भातपिके करपू लागली आहेत. पिके हातातोंडाशी आली असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आतापर्यंत केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
जून महिन्यात शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली. उगवण झाल्यानंतर जुलैमध्ये पावसाने पुन्हा दडी मारल्याने अनेक ठिकाणी लहान रोपे करपली. तरीही अनेक शेतकऱ्यांनी दुबार लावणी तसेच पूर्ण लावणी करून पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेली पिके धोक्यात आली आहेत.
जमिनीत ओलावा असला तरी भातपिकासाठी अधूनमधून पावसाची सर आवश्यक असते. सध्या पावसाअभावी अनेक शेतजमिनींना भेगा पडल्या असून काही ठिकाणी हाताची बोटे जावीत एवढ्या मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातच पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
पावसाच्या आशेने थांबलेल्या अनेक शेतकऱ्यांनी अखेर नाईलाजाने रोटाव्हेटर फिरवून उभी पिके नष्ट केली आहेत. आता पाऊस झाला तरी हातातून गेलेल्या पिकांची भरपाई होण्याची शक्यता कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बांधावर यावे
कर्नाटकातील दुष्काळी भागांची मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. त्याच धर्तीवर बेळगाव परिसरातील पावसाअभावी करपू लागलेल्या पिकांची तसेच बळ्ळारी नाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी येथील शेतकऱ्यांना धीर द्यावा, अशी मागणी होत आहे.
पिकांचे नुकसान किती झाले आहे, याचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta