Sunday , September 20 2026
Breaking News

चव्हाट गल्ली अग्निकांड : पालकमंत्री सतीश जारकीहोळींची घटनास्थळी पाहणी; पीडित कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन

Spread the love

बेळगाव : चव्हाट गल्ली परिसरातील ढोर गल्ली येथे मध्यरात्री घडलेल्या भीषण अग्निकांडात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी पोलीस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, उत्तरचे आमदार आसिफ सेठ, महापौर प्रीती खामकर, मनपा आयुक्त एम. कार्तिक, उपमहापौर तसेच भाजप नेते किरण जाधव यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घराला अचानक आग लागली. काही क्षणांत आगीने रौद्ररूप धारण केल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

फॉरेन्सिक पथकाकडून तपास

आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली आहे. आग नेमकी कशामुळे लागली, तसेच दुर्घटनेला कोणाची जबाबदारी आहे, हे तपास अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पालकमंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. तपासात कोणाची चूक आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पीडितांना शासनाकडून मदत

पीडित कुटुंबीयांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली जाणार आहे. उपचाराचा खर्च, आगीमुळे झालेले नुकसान आणि कुटुंबीयांना भविष्यात आवश्यक असलेल्या मदतीबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात येईल, असे जारकीहोळी यांनी सांगितले.

असुरक्षित घरांचा प्रश्न ऐरणीवर

ढोर गल्ली परिसरातील अनेक कुटुंबे असुरक्षित घरांमध्ये राहत असल्याचा मुद्दाही यावेळी समोर आला. अशा कुटुंबांना सुरक्षित घरे उपलब्ध करून देण्यासाठी घरकुल योजनांमध्ये प्राधान्य देण्याबाबत सरकारकडे सूचना केली जाईल. महापौर, आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून यावर उपाययोजना करण्याचे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.

या हृदयद्रावक घटनेमुळे ढोर गल्लीसह संपूर्ण बेळगाव शहरावर शोककळा पसरली असून, पीडित कुटुंबीयांना शासनाने तातडीने आर्थिक व इतर आवश्यक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *