Sunday , September 20 2026
Breaking News

ड्रायफ्रूट्सच्या दागिन्यांनी सजला माळी गल्लीचा पर्यावरणपूरक गणराया

Spread the love

 

झगमगाटाला फाटा देत साधेपणाने स्थापना; सलग सहाव्या वर्षी पर्यावरण संवर्धनाचा संदेश

बेळगाव : विद्येची आणि कलेची देवता असलेल्या श्री गणरायाचे सोमवारी उत्साहात आगमन झाले. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना, गणेशोत्सवाचा उत्साह पर्यावरणपूरक असावा, या उद्देशाने माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सलग सहाव्या वर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. यंदाची सात फूट उंचीची गणेशमूर्ती शेडू माती आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून साकारण्यात आली असून, ड्रायफ्रूट्सच्या आकर्षक सजावटीमुळे ती विशेष ठरली आहे.

गणरायाच्या आगमन सोहळ्याची वाढती क्रेझ, पाटपूजन, खांबपूजन, आगमन मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचे ‘इव्हेंट’मध्ये रूपांतर करण्याचा वाढता कल सध्या पाहायला मिळतो. या झगमगाटाला फाटा देत माळी गल्ली मंडळाने मात्र यंदाही साधेपणा, भक्तिभाव आणि पर्यावरण संवर्धनाचा आदर्श जपला आहे. कोणताही अनाठायी खर्च किंवा दिखावा न करता पारंपरिक पद्धतीने बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

मूर्तिकार यल्लाप्पा पालकर यांनी सात फूट उंचीची ही अनोखी शेडू मातीची मूर्ती साकारली आहे. मूर्तीमध्ये गवताचाही वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मूर्तीची सजावट करण्यासाठी कृत्रिम साहित्याचा वापर टाळून कलिंगडाच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बियांचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच बाप्पाच्या दागिन्यांसाठी काजू, बदाम, मनुके आणि अंजीर या ड्रायफ्रूट्सचा वापर करण्यात आल्याने मूर्तीला आगळेवेगळे सौंदर्य प्राप्त झाले आहे.

यापूर्वी मंडळातर्फे दरवर्षी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यात येत होती. मात्र ती तुलनेने हलकी असल्याने विसर्जनानंतर पाण्यात विरघळण्यासाठी अधिक वेळ लागत होता. त्यामुळे यंदा अधिक नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून शेडू मातीची मूर्ती साकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘उत्सव भक्तीचा असावा, दिखाव्याचा नव्हे’, हा संदेश देत माळी गल्ली मंडळाने गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच एकता आणि बंधुभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न केला आहे.

मंडळाचे अध्यक्ष भाऊराव चौगुले, कार्याध्यक्ष मेगन लंगरकांडे, तसेच महेश बडबंजी, अभिजीत लंगरकांडे, मदन लोहार, सुरज भोसले, कपिल खटावकर आणि कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *