Sunday , September 20 2026
Breaking News

मराठी शाळांच्या घटत्या संख्येवर भाष्य करणारी गणेशोत्सवाची सजावट

Spread the love

 

रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे शासकीय मराठी प्राथमिक शाळा क्र. ३४, अनगोळ येथे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

बेळगाव : गणेश चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांच्या वतीने अनगोळ येथील शासकीय मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ३४ येथे गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

गणेशमूर्तीचे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीद्वारे आगमन करण्यात आले. पारंपरिक उत्साह आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी करण्यात आलेली सजावट विशेष आकर्षण ठरली. या सजावटीच्या माध्यमातून बेळगाव परिसरातील मराठी शाळांची तसेच सरकारी शाळांची घटती संख्या आणि त्यामागील विविध सामाजिक प्रश्न प्रभावीपणे मांडण्यात आले. पालकांचा मराठी माध्यमाऐवजी इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल, उच्च शिक्षणाच्या अपेक्षा, आर्थिक अडचणी, शाळांमधील सुविधांचा अभाव, सरकारी शाळांकडे होणारे दुर्लक्ष आणि आवश्यक सरकारी पाठबळाचा अभाव यांसारख्या विषयांवर सजावटीतून भाष्य करण्यात आले.

तसेच, नवीन पिढी आपल्या मातृभाषेपासून दुरावत चालली आहे, ही चिंताजनक बाबही या संकल्पनेतून अधोरेखित करण्यात आली. इंग्रजी माध्यमाकडे वाढणारे आकर्षण आणि त्याचा मराठी शाळांवर होणारा परिणाम याबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा संदेश या सजावटीतून देण्यात आला.

या विशेष प्रसंगी शाळेच्या शिक्षिका जयश्री पाटील, शुभांगी पाटील आणि रेखा चवती यांच्यासह रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगावचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

गणेशमूर्तीची आरती व पूजा रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगावचे अध्यक्ष हर्षित कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी क्लबचे सचिव रोहित अंगोलकर, इमिजिएट पास्ट DRR हर्ष परेश शिंदे तसेच पास्ट DRR अनिकेत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक परंपरेचे जतन न करता मराठी भाषा, मराठी शाळा आणि मातृभाषेच्या संवर्धनाचा सामाजिक संदेश देण्याचा रोटरॅक्ट क्लबचा हा उपक्रम उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *