







१६ सप्टेंबरच्या बोर्डावर दावा; सीमाभागातील जनतेच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाकडे
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या प्रलंबित दाव्यावर उद्या, बुधवार (१६ सप्टेंबर) रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. १६ सप्टेंबरच्या सुनावणी यादीत सीमाप्रश्नाचा दावा समाविष्ट झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून सीमालढ्याच्या निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या सीमाभागातील नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.
सीमाप्रश्नाची सुनावणी लवकर व्हावी, यासाठी अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजीराव जाधव यांनी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी सरन्यायाधीशांच्या न्यायालयात हे प्रकरण मेंशन केले होते. त्यानंतर दावा ९ सप्टेंबरच्या बोर्डावर आला होता. मात्र, त्या दिवशी सुनावणी होऊ शकली नाही. आता पुन्हा १६ सप्टेंबरच्या यादीत प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, सीमाप्रश्नाच्या कायदेशीर लढ्याला बळ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ८ जुलै रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या निर्णयानुसार ज्येष्ठ विधीज्ञ गोपाळ सुब्रमण्यम यांची नियुक्ती केली आहे. सोमवारी (१४ सप्टेंबर) त्यांनी या प्रकरणासंदर्भात सविस्तर ब्रीफिंग घेतले.
या बैठकीस ज्येष्ठ वकील अपराजिता, शिवाजीराव जाधव, दिनेश ओऊळकर, राहुल प्रताप आणि संतोष काकडे उपस्थित होते. तसेच बेळगावहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वकील महेश बिरजे आणि मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे सहभागी झाले.
उद्याच्या सुनावणीकडे लक्ष
९ सप्टेंबर रोजी सुनावणी न झाल्यानंतर आता पुन्हा सीमाप्रश्नाचा दावा बोर्डावर आल्याने उद्याच्या सुनावणीकडे विशेष लक्ष लागले आहे. प्रकरण प्रत्यक्ष सुनावणीस येते का, न्यायालयाकडून पुढील तारीख किंवा निर्देश मिळतात का, याकडे सीमाभागातील नागरिकांसह महाराष्ट्राच्या सीमालढ्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta