







पावसाची प्रतीक्षा कायम
निपाणी (वार्ता) : पावसाळ्याचे दिवस सरत चालले असतानाही तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाअभावी शेतशिवारातील पिकांची अवस्था केविलवाणी झाली असून, मोठ्या आशेने पेरणी केलेले सोयाबीन पीक आता अक्षरशः पालापाचोळा होण्याच्या मार्गावर आहे. उत्पादनाची चिंता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा फिरत नसून त्याचा थेट परिणाम शहरातील बाजारपेठेवर झाला आहे.
तालुक्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांवर शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असते. यंदा सुरवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडली आहेत. पेरणी, बियाणे, खत, औषधांची फवारणी आणि मशागतीसाठी शेतकऱ्यांनी खर्च केला आहे. मात्र, पिकेच धोक्यात आल्याने हा खर्चही निघेल की नाही, अशी चिंता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दैनंदिन गरजांसह सणासुदीची खरेदीही पुढे ढकलली आहे. याचा परिणाम किराणा, कापड, कृषी साहित्य, सराफ, इलेक्ट्रॉनिक्स तसेच अन्य छोट्या-मोठ्या व्यवसायांवर झाला आहे.
—————————————————————–
सणासुदीवरही संकटाचे सावट
गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी यासारखे सण जवळ येत असताना बाजारपेठेत उलाढालीची अपेक्षा असते. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने नवीन कपडे, घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, दुचाकी तसेच सोन्या-चांदीच्या वस्तूंची खरेदी पुढे ढकलण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आली आहे.
——————————————————————–
‘सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या खरेदीला चांगली मागणी असते.मात्र यंदा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरच संकट आले आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम केवळ शेतावर नाही, तर बाजारपेठेवर झाला आहे. पाऊस पडला तरच बाजारपेठेला उभारी मिळेल. शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला तरच बाजारपेठेत खरेदी-विक्रीला वेग येतो. त्यामुळे सध्या बाजारपेठेला पावसाची आणि शेतकऱ्यांना पिके वाचण्याची प्रतीक्षा आहे.
-सुरेश शेट्टी, सराफ व्यापारी, निपाणी.

Belgaum Varta Belgaum Varta