Sunday , September 20 2026
Breaking News

तंजावरच्या साहित्य संमेलनात ‘बेळगावचा झेंडा’!

Spread the love

 

सीमाभागातील मान्यवर साहित्यपीठावर विशेष अतिथी

बेळगाव (प्रतिनिधी) : मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या इतिहासात मानाचे स्थान असलेल्या तंजावरच्या ऐतिहासिक भूमीत बेळगाव सीमाभागातील मराठी साहित्याचा आवाज बुलंद होणार आहे. बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित श्रीमंत छत्रपती सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनात बेळगाव सीमाभागातील मान्यवर, साहित्यिक आणि कवींचा विशेष सहभाग लाभणार असून, त्यामुळे तंजावरच्या भूमीत ‘बेळगावचा झेंडा’ अभिमानाने फडकणार आहे.

संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष व सीमाकवी रवींद्र पाटील तसेच बेळगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आप्पासाहेब गुरव यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. सीमाभागातील मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचे प्रतिनिधित्व करणारी ही उपस्थिती विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

यावेळी संमेलनाच्या ग्रंथदिंडीच्या शुभारंभप्रसंगी अ.भा.म.सा. परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून तंजावरच्या भूमीत मराठी ग्रंथपरंपरेचा आणि साहित्यसंस्कृतीचा जागर केला जाणार आहे.

यावेळी तंजावरचे श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांचा बेळगाव सीमाबांधवांच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव जिल्हा कार्याध्यक्ष महादेव चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

या संमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अ.भा.म.सा. परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष व सीमाकवी रवींद्र पाटील हे संमेलनातील विचारपीठांवर सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. सीमाभागातील मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि मराठी अस्मितेच्या जतनासाठी सुरू असलेल्या साहित्यिक वाटचालीचे प्रतिनिधित्व त्यांच्या सहभागातून तंजावरच्या व्यासपीठावर होणार आहे.

संमेलनाचे अध्यक्ष मा. डॉ. शरद गोरे, उद्घाटक मा. श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले, स्वागताध्यक्ष मा. प्रा. डॉ. लक्ष्मणराव ढोबळे आणि निमंत्रक मा. श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा साहित्यिक सोहळा संपन्न होणार आहे.

तंजावर ही श्रीमंत छत्रपती सरफोजीराजे भोसले यांच्या मराठीप्रेमाची ऐतिहासिक भूमी, मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या समृद्ध परंपरेशी जोडलेल्या या भूमीत सीमाभागातील साहित्यिकांना मिळणारे व्यासपीठ हा बेळगावच्या मराठी साहित्यविश्वासाठी गौरवाचा क्षण मानला जात आहे.

सीमाभागातून मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या चळवळीची दखल तंजावरच्या साहित्यपीठावर घेतली जाणे, ही मायमराठीच्या अखंड साहित्यिक प्रवाहाला मिळालेली मानाची पावती असल्याची भावना मराठीप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

एकीकडे सरफोजीराजांची मराठी परंपरा, तर दुसरीकडे सीमाभागातून मायमराठीसाठी सुरू असलेली साहित्यिक वाटचाल—या दोन प्रवाहांचा ऐतिहासिक आणि साहित्यिक संगम तंजावरच्या भूमीत अनुभवायला मिळणार आहे.

तंजावरच्या व्यासपीठावर सीमाभागाचा साहित्यिक ठसा उमटणार आणि मायमराठीचा जयघोष घुमणार हीच बेळगावच्या साहित्यविश्वासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *