







बेळगाव : अन्नधान्य वितरणाची सुविधा अधिक सुलभ करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना रेशन घेताना बोटांचे ठसे देण्यापासून सूट देण्याचा विचार सुरू आहे. यासाठी रेशन दुकानदारांकडून पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांची यादी तयार केली जात असून, डोळ्यांच्या बुबुळांच्या (आयरिस) स्कॅनच्या आधारे धान्य वितरण करण्याचा पर्याय विचाराधीन आहे.
अन्नधान्य योजनेअंतर्गत बीपीएल रेशनकार्डधारकांना मोफत धान्य मिळवण्यासाठी दरमहा बायोमेट्रिक पडताळणी करणे आवश्यक आहे. मात्र बांधकाम, शेती तसेच इतर कष्टाची कामे करणाऱ्या लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे अनेकदा स्पष्टपणे उमटत नसल्याने धान्य वितरणात अडचणी निर्माण होतात. परिणामी लाभार्थ्यांना रेशन दुकानांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागतात.
याशिवाय सर्व्हर डाऊन होणे, तांत्रिक अडचणी यामुळेही धान्य वितरण प्रक्रिया विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी आहेत. याचा त्रास लाभार्थ्यांसह रेशन दुकानदारांनाही सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विभागाकडून पर्यायी बायोमेट्रिक पद्धतीचा विचार केला जात आहे.
ज्येष्ठांना घरपोच धान्य
रेशन दुकानात स्वतः जाऊ न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना घरपोच अन्नधान्य देण्याची सुविधाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ७५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आणि एकटे राहणारे पात्र ज्येष्ठ नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. जवळच्या रेशन दुकानामार्फत त्यांच्या घरापर्यंत धान्य पोहोचविण्यात येणार आहे.
या घरपोच सेवेसाठी रेशन दुकानदारांना सरकारकडून प्रति कुटुंब ५० रुपये देण्यात येणार आहेत. घरपोच धान्याची सुविधा घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना अनिवार्यपणे नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रेशन मिळवताना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta