Sunday , September 20 2026
Breaking News

नगरपंचायतीच्या निष्काळजी कारभाराविरोधात विवेक गिरी यांचा एल्गार; उद्यापासून आमरण अन्नत्याग उपोषण

Spread the love

 

 

उच्च न्यायालयाच्या आदेशाची व जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांची अंमलबजावणी न झाल्याचा गंभीर आरोप; संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी.

खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या कथित निष्काळजी आणि संशयास्पद कार्यपद्धतीविरोधात ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक विवेक गिरी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून उद्या बुधवार दि. 16 सप्टेंबर 2026 पासून खानापूर नगरपंचायतीसमोर आमरण अन्नत्याग उपोषण करण्याची घोषणा केली आहे.

खानापूर शहरातील समादेवी गल्ली येथील तीगडीमठ यांच्या घराच्या सुरू असलेल्या बांधकामासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले नसल्याचा, तसेच बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांकडेही नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप विवेक गिरी यांनी केला आहे.

गिरी यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बांधकाम प्रकरणात उच्च न्यायालयासमोर देण्यात आलेल्या संमतीपत्रातील अटी तसेच बांधकाम परवानगीपत्रात नमूद केलेल्या नकाशाप्रमाणे बांधकाम करण्याचे निर्देश आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्याप्रमाणे बांधकाम होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या प्रकरणी 1 सप्टेंबरपासून नगरपंचायतीकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला असून, 3 सप्टेंबर रोजी लेखी तक्रारही दाखल केली होती, असे गिरी यांनी सांगितले. नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित कारवाई न झाल्याने त्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडेही लेखी तक्रार केली.

या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायतीला सदर बांधकामाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते, असा दावा गिरी यांनी केला. मात्र, नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी बांधकामस्थळी जाऊन केवळ पाहणी व मोजमाप करण्यापलीकडे ठोस कारवाई केली नसल्याने संबंधित बांधकाम सुरूच राहिले आणि अखेर घराच्या स्लॅबचे काम पूर्ण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

न्यायालयाचा आदेश आणि जिल्हा प्रशासनाचे निर्देश असतानाही बांधकाम रोखण्यासाठी प्रभावी कारवाई का करण्यात आली नाही? असा थेट सवाल विवेक गिरी यांनी उपस्थित केला आहे. अधिकाऱ्यांच्या कथित दुर्लक्षामुळे संबंधितांना बांधकाम पूर्ण करण्याची संधी मिळाली असून, यामुळे नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट, अभियंता तिरुपती राठोड तसेच खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लालासाहेब गोवंडी यांनी या प्रकरणात आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे का, तसेच संबंधित बांधकाम करणाऱ्या व्यक्तींशी कोणतेही संगनमत किंवा नियमबाह्य सहकार्य झाले आहे का, याची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गिरी यांनी केली आहे.

“उच्च न्यायालयाचा आदेश आणि जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश धाब्यावर बसवून जर बांधकाम सुरू राहिले असेल, तर त्याची जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. केवळ पाहणी आणि मोजमाप करून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही,” असा संतप्त सवाल गिरी यांनी उपस्थित केला.

या संपूर्ण प्रकाराच्या निषेधार्थ बुधवार, दि. 16 सप्टेंबर 2026 पासून खानापूर नगरपंचायतीसमोर अन्नत्याग सत्याग्रह सुरू करणार असल्याचे विवेक गिरी यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

श्री. संतोष कुरबेट (मुख्याधिकारी नगरपंचायत खानापूर), श्री. तिरुपती राठोड (अभियंता, नगरपंचायत खानापूर) तसेच खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. लालासाहेब गोवंडी—आपल्या कर्तव्यात कसूर केली आहे का आणि त्यांनी संबंधित नियमभंग करणाऱ्या व्यक्तीसोबत संगनमत केले आहे का, याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी यासाठी खानापूर ते ज्येष्ठ पत्रकार व माजी नगरसेवक विवेक गिरी हे अन्नत्याग सत्याग्रह करणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *