








नाविन्य सखी ग्रुपच्या नृत्य-नाट्यातून पर्यावरण, व्यसनमुक्तीसह सामाजिक वास्तवावर भाष्य
बेळगाव : गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणशुद्धी, मानसिक प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जेसाठी विविध गणेशोत्सव मंडळांतर्फे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मात्र, भोई गल्ली येथील सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळाने धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाजप्रबोधनाला प्राधान्य देत अनोखा उपक्रम राबविला.
भोई गल्ली येथील हरिप्रिया महिला मंडळाच्या पुढाकारातून गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘नाविन्य सखी ग्रुप’च्या मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेशभक्तांचे मनोरंजन होण्यासोबतच सामाजिक संदेश प्रभावीपणे पोहोचावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नाविन्य सखी ग्रुपच्या प्रमुख सविता क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांनी मंगळागौरीच्या माध्यमातून नृत्य आणि नाट्याचा सुरेख संगम साधत सुमारे ४५ मिनिटे समाजप्रबोधन केले. ‘पर्यावरण वाचवा’, ‘व्यसनमुक्ती’, ‘स्वच्छ भारत अभियान’ तसेच सध्याची सामाजिक वास्तव परिस्थिती अशा विविध विषयांवर प्रभावी सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मनोरंजनातून प्रबोधनाचा संदेश देत महिलांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अमृता मैलेश्वर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर महिलांच्या उपस्थितीत बाप्पाची महाआरती करण्यात आली.
यावेळी हरिप्रिया महिला मंडळाच्या सदस्या उषा चव्हाण, पूजा जगजम्पी, गौरी नरगुंदकर, प्राजक्ता पाटील, वैभवी दरवंदर, वैशाली चव्हाण, वैशाली मोकाशी, अनिता पवार, अश्विनी हलकर्णी, सोनाली पवार, पूजा वंटमुरी, सुषमा सुंटुकर, प्रज्ञा वंटमुरी, तृप्ती कांडेन्नवर, निकिता भोवी, संध्या चव्हाण, रोहिणी नेगिन्हाळ आणि अरुणा चव्हाण यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिला मंडळाच्या पुढाकारातून आयोजित हा समाजप्रबोधनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आभार अमृता मैलेश्वर यांनी मानले. शेवटी उपस्थित भक्तांना अल्पोपहाराचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Belgaum Varta Belgaum Varta