








बेळगाव : थकीत वीज बिलामुळे स्टोन क्रशरचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून हेस्कॉमच्या दोन अधिकाऱ्यांना निवासस्थानी बोलावून मारहाण केल्याचा गंभीर आरोप विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यावर करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी बेळगावातील कुवेम्पूनगर येथील त्यांच्या निवासस्थानी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात हेस्कॉमचे एईई दीपक डी. आणि सेक्शन ऑफिसर राजू चव्हाण यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव तालुक्यातील तारिहाळ येथील लक्ष्मी स्टोन क्रशरकडे सुमारे तीन महिन्यांपासून ७७ हजार ३६० रुपयांचे वीज बिल थकीत होते. सदर क्रशर हट्टीहोळी यांचे निकटवर्तीय प्रमोद जाधव यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात येते. थकीत बिलाची रक्कम न भरल्याने हेस्कॉम अधिकाऱ्यांनी गुरुवारी क्रशरचा वीजपुरवठा खंडित केला.
यानंतर शुक्रवारी सकाळी एईई दीपक आणि सेक्शन ऑफिसर राजू चव्हाण यांना निवासस्थानी बोलावण्यात आले. वीजपुरवठा का खंडित केला, अशी विचारणा करत शिवीगाळ करण्यात आली तसेच शर्ट पकडून मारहाण केल्याचा आरोप एईई दीपक यांनी केला आहे.
घटनेची माहिती हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. दरम्यान, हेस्कॉमचे कर्मचारी एपीएमसी पोलीस ठाण्यात जमा झाले असून त्यांनी घटनेबाबत संताप व्यक्त केला.
या आरोपांची अधिकृत पोलिस तपासणी होणे बाकी असून, तपासानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta