








बेळगाव : गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बेळगाव शहरातील २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह खानापूर तालुक्यातील नंदगड-दांती गावाजवळ आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सर्वेश कंग्राळकर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो शहरातील मारुती गल्ली, सांबरा रोड परिसरातील रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, २० सप्टेंबर रोजी सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून सर्वेश घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी माळमारुती पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, मंडोळी रोड परिसरात एका तरुणाला मारहाण करून कारमधून घेऊन गेल्याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी सर्वेशचा शोध घेण्यासाठी दोन पथके नियुक्त केली होती.
शोधमोहीम सुरू असतानाच खानापूर तालुक्यातील नंदगड-दांती गावाजवळ सर्वेशचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मंडोळी रोडवरील कथित मारहाणीच्या घटनेचा आणि सर्वेशच्या मृत्यूचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस तपास करीत आहेत. मात्र, सध्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध आरोप निश्चित झालेला नाही.
मृतदेह आढळलेल्या ठिकाणासह सर्वेशच्या बेपत्ता होण्याशी संबंधित विविध बाबींचा पोलीस तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. माळमारुती पोलीस ठाण्यात बेपत्ता प्रकरण, तर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे सर्वेशच्या मृत्यूमागे नेमके काय घडले, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून तपासातून या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

Belgaum Varta Belgaum Varta