Monday , October 5 2026
Breaking News

भरकटलेल्या तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी गल्लीवार बैठका घेणार

Spread the love

 

मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सभेत निर्णय; शैक्षणिक निधी उभारण्यावरही भर

बेळगाव : मराठा समाजातील भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना सकारात्मक दिशा देण्यासाठी गल्लीवार व विभागवार बैठका घेऊन विचारमंथन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला.

मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या सभागृहात ही सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सहचिटणीस संग्राम गोडसे, खजिनदार के. एल. मजूकर, कार्यकारिणी सदस्य ईश्वर लगाडे, सुरेंद्र जाधव, दत्तात्रय जाधव, राजू पावले आणि प्रकाश गडकरी उपस्थित होते.

सभेत समाजातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुहूर्तावर विवाह संपन्न होणे, उपवर मुलांची वाढती संख्या, शैक्षणिक प्रगती तसेच दीर्घकाळ लांबणारा गणेशोत्सव विसर्जन सोहळा याबाबत उपस्थितांनी चिंता व्यक्त केली. समाजातील गल्लीवार पंच मंडळी व युवक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी स्वतंत्र शैक्षणिक निधी उभारण्याचे ठरविण्यात आले. यावेळी उमेश पाटील यांनी १५ हजार रुपये, तर विनोद आंबेवाडीकर व सतीश देसाई यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांची रोख देणगी दिली. लक्ष्मण मेणसे आणि प्रा. नीता पाटील यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. समाजातील सधन व्यक्तींनी या निधीस सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन प्रकाश मरगाळे यांनी केले.

समाजातील महिलांना विविध क्षेत्रांत प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र महिला विभाग स्थापन करण्याची जबाबदारी प्रा. नीता पाटील यांच्यावर सोपविण्यात आली.

यावेळी नेताजी जाधव, सतीश देसाई, मोहन कंग्राळकर, रणजीत हावळण्णाचे, प्रदीप चव्हाण, श्रीधर खन्नूकर, संदीप मुतकेकर आदींनी विविध उपयुक्त सूचना मांडल्या.

सभेच्या प्रारंभी शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. संग्राम गोडसे यांनी मागील वर्षाचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी घेतली. सन २०२५-२६ या वर्षाचा जमाखर्च व ताळेबंद के. एल. मजूकर यांनी सादर केला आणि त्यासही मंजुरी देण्यात आली. सन २०२६-२७ साठी लेखापरीक्षक म्हणून अनिल मंडोळकर, तर सहाय्यक म्हणून सुनील आनंदाचे यांच्या नावास मंजुरी देण्यात आली. ईश्वर लगाडे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

आयएमएच्या बेळगाव शाखाध्यक्षपदी डॉ. सविता कद्दू, सचिव पदी डॉ. माधव प्रभू

Spread the love  बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या बेळगाव शाखेच्या नूतन अध्यक्षपदी डॉ. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *