


परवानगी अटींचे उल्लंघन; टिळकवाडी, खडेबाजार पोलिसांची कारवाई
बेळगाव : गणेशमूर्ती विसर्जनासाठी निर्धारित वेळेचे पालन न करता मिरवणूक लांबविणाऱ्या चार गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. टिळकवाडी पोलिसांनी दोन, तर खडेबाजार पोलिसांनी दोन मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विसर्जन मिरवणुकीसाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव मंडळांना मिरवणूक व विसर्जनाबाबत ठरवून दिलेल्या वेळेचे आणि मार्गाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही मंडळांनी निर्धारित वेळेत विसर्जन न करता मिरवणूक सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
टिळकवाडी पोलिसांनी कंग्राळ गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रतीक शरद पाटील तसेच सदस्य सुहास नारायण चौगुले, रोहन गोपाळ नीलकंठे, बाबुराव संभाजी इरळे आणि मयूर विजय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच गणचारी गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गंगाधर शिवानंद पाटील आणि सदस्य उमेश मनोहर अप्पुगोळ, राजू तळवार, सुदेश लाटे व शुभम चंदन ठाकूर यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.
खडेबाजार पोलिसांनी अनगोळ येथील मारुती गल्लीमधील श्री गणेशोत्सव युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच राजहंस गल्ली येथील श्रीराम युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गणेशोत्सव मिरवणुकीदरम्यान वेळेचे नियोजन आणि प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले होते. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर आता थेट गुन्हे दाखल करण्यात येत असल्याने आगामी काळात अशा प्रकारच्या मंडळांवरील कारवाईला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

Belgaum Varta Belgaum Varta