


दोघांच्या डोक्यात, हातावर वार; ‘आज सोडत नाही, खल्लास करतो’ म्हणत जीवे मारण्याचा प्रयत्न
बेळगाव : पत्नीला भेटण्यासाठी घरी आलेल्या तरुणासह पत्नीवर पतीने लोखंडी रॉडने हल्ला करून दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (५) रात्री सुमारास हुंचेनहट्टी येथे घडली. या हल्ल्यात शिल्पा उदय बडीगेर (वय ३२) आणि बसवराज पराप्पा कबाडगी (वय २९, रा. शिवापूर, ता. गोकाक) हे दोघे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी बसवराज कबाडगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदय बडीगेर (रा. हुंचेनहट्टी) याच्याविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी (६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवराज कबाडगी हे २०२४ मध्ये व्हीटीयू परिसरातील एका मेसमध्ये कामाला होते. त्याच मेसमध्ये शिल्पाही काम करत असल्याने दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर बसवराज यांचे शिल्पाच्या घरी येणे-जाणे सुरू होते. काही काळानंतर त्यांनी मेसमधील काम सोडून गाव गाठले. त्यानंतर कामानिमित्त ते पुण्याला गेले होते.
सोमवारी (५) काम मिळाल्याने पुण्याहून ते पुन्हा गावी आले. सायंकाळी बेळगाव येथे भावाला भेटण्यासाठी आले असता परिचयातील शिल्पासोबत बोलण्यासाठी ते हुंचेनहट्टी येथे गेले. रात्री सुमारे नऊच्या दरम्यान दोघे घरी गेले.
दरम्यान, रात्री दहाच्या सुमारास उदय बडीगेर घरी आला. घरात बसवराज यांना पाहताच त्याने शिवीगाळ सुरू केली. ‘तू येथे का आला आहेस?’ असा जाब विचारत ‘आज तुम्हाला सोडत नाही, खल्लास करतो,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर त्याने लोखंडी रॉडने बसवराज यांच्या डोक्यात व हातावर, तसेच शिल्पाच्या डोक्यात वार करून दोघांना जखमी केले.
या घटनेनंतर बसवराज कबाडगी यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी उदय बडीगेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta