


बेळगाव : शेतात काम करत असताना शेतकऱ्यावर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील भडांगे कॉलनी परिसरात बुधवारी सकाळी घडली. अजित वासुदेव पाटील (वय ६१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पाटील हे सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास शेतातील पिकांना पाणी सोडण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. मधमाशांपासून बचाव करण्यासाठी त्यांनी घराच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ल्यामुळे त्यांना गंभीर त्रास होऊन ते वाटेतच बेशुद्ध पडले.
दरम्यान, शेजारील शेतकऱ्याला ही घटना निदर्शनास आल्यानंतर त्याने गावात माहिती दिली. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अजित पाटील यांना उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अजित पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांसह नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे.
शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेत परिसरात मधमाशांची पोळी किंवा वस्ती आढळल्यास विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतीची कामे करताना मधमाशांच्या पोळ्यांना किंवा त्यांच्या अधिवासाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेची दखल घेऊन एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच संबंधित प्रशासनाने पुढाकार घेत अजित पाटील यांच्या कुटुंबीयांना शासन नियमानुसार योग्य ती नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
अंत्यविधी आज सायंकाळी ४ वाजता दर्शन तलावाजवळील गावडे वैकुंठधाम येथे होणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta