


दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चौघांचा धुडगूस; माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बेळगाव : पुण्याहून धारवाडकडे जाणारी बोलेरो गाडी अडवून चालकाला चाकूचा धाक दाखवत रोख रकमेसह मोबाईल असा एकूण ५९ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना हिंडाल्को पुलाजवळील मोठ्या सर्कल परिसरात घडली. याप्रकरणी चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन संजीव वाजंत्री (वय ३४, रा. हल्ल्याळ रोड, धारवाड) हे गुरुवारी मध्यरात्रीनंतर आपल्या बोलेरो वाहनातून धारवाडच्या दिशेने जात होते. शुक्रवारी मध्यरात्री २.१० च्या सुमारास ते हिंडाल्को पुलाजवळील मोठ्या सर्कल परिसरात आले असता, दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चौघांनी त्यांना वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, सचिन यांनी वाहन न थांबवता पुढे नेले.
यानंतर चौघांनी मोटारसायकलींवरून पाठलाग करून बोलेरो अडवली. सचिन यांना पकडून ठेवत शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून धमकावत त्यांच्या खिशातील १८ हजार रुपये रोख रक्कम आणि ४१ हजार रुपये किमतीचा मोबाईल संच असा एकूण ५९ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.
लुटीनंतर दोन्ही मोटारसायकलींवरून चौघांनी घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, माळमारुती पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta