


नंदन मक्कल धाममधील चिमुकल्यांच्या हस्ते महाआरती; मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे तेज
बेळगाव : सांस्कृतिक आणि सामाजिक भान जपत आपल्या कार्यातून आगळीवेगळी ओळख निर्माण करणाऱ्या समर्थ नगर येथील सार्वजनिक श्री नवरात्र उत्सव मंडळ, एसटीएमतर्फे शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर) सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम राबविण्यात आला. नंदन मक्कल धाम या आश्रमातील मुलांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
यावेळी भव्यदिव्य दुर्गामूर्तीचे दर्शन घेताना आश्रमातील चिमुकले भारावून गेले होते. महाआरती करण्याचा मान मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि निरागस आनंदाने उपस्थितांची मने जिंकली.
मंडळातर्फे प्रत्येक मुलाला आरतीचा मान देण्यात आला. आरतीनंतर मुलांना खाऊ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. या उपक्रमामुळे नवरात्रोत्सवातील भक्तिमय वातावरणाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाली.
यावेळी नंदन मक्कल धामच्या शिक्षिकांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, बेळगावमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांसाठी आवर्जून आमंत्रित करणारे समर्थ नगरमधील नागरिक हेच आहेत. मंडळाच्या या आपुलकीच्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाबद्दल त्यांनी आभार मानले.
आश्रमातील चिमुकल्यांचा आनंद पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावरही समाधान आणि आनंद दिसून येत होता. धार्मिक उत्सव केवळ पूजाअर्चेपुरते मर्यादित न ठेवता त्यातून सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि आनंदाची देवाणघेवाण जपण्याचा आदर्श एसटीएम मंडळाने या उपक्रमातून घालून दिला.

Belgaum Varta Belgaum Varta