


पाच रुपयांच्या फोन-पे व्यवहारातून सायबर फसवणूक; खात्यातून १ लाख ४ हजार रुपये लंपास
बेळगाव : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन क्लृप्त्या वापरल्या जात आहेत. कुरिअर चुकून दुसऱ्या शहरात गेल्याचे सांगून ते परत मिळविण्यासाठी अवघे पाच रुपये फोन-पे करण्यास सांगत येल्ली मुन्नोळी येथील एका २९ वर्षीय शेतकरी तरुणाला सायबर गुन्हेगारांनी लाखाचा गंडा घातला आहे. या फसवणुकीत तरुणाच्या बँक खात्यातून तब्बल एक लाख चार हजार रुपयांहून अधिक रक्कम लंपास करण्यात आली आहे. याप्रकरणी जिल्हा सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी श्रीधर या २९ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. श्रीधर यांच्या बहिणीने बीएस्सी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तिने वर्षभरापूर्वी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी केली होती. कर्नाटकात नोकरी करण्यासाठी महाराष्ट्राकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आवश्यक असल्याने त्यासाठीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली होती.
दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी श्रीधर यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. तुमचे कुरिअर महाराष्ट्रातून कोलकाता येथे चुकून पाठविण्यात आले आहे, असे सांगत ते परत मिळविण्यासाठी मोबाईलवर लिंक पाठविण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. या लिंकवर वैयक्तिक माहिती भरून केवळ पाच रुपये फोन-पेद्वारे पाठविण्याची सूचना करण्यात आली.
कुरिअर परत मिळविण्याच्या आशेने श्रीधर यांनी संबंधित लिंकवर आपले नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांकासह मागितलेली माहिती भरली. त्यानंतर फोन-पेद्वारे पाच रुपयांचा व्यवहारही केला. मात्र, या छोट्याशा व्यवहाराच्या बहाण्याने सायबर गुन्हेगारांनी त्यांना जाळ्यात ओढले.
३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या बँक खात्यातून एक लाख चार हजार रुपयांहून अधिक रक्कम काढून घेण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा सायबर क्राईम विभागाकडे धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंकवर वैयक्तिक किंवा बँकविषयक माहिती भरू नये. कुरिअर, पार्सल किंवा अन्य सेवांच्या नावाखाली पैसे मागितले जात असल्यास त्याची अधिकृत माध्यमातून खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta