


न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : रामायण हा केवळ ग्रंथ नसून जीवन जगण्याची कला आहे. महर्षी वाल्मीकी यांच्या जीवनातील परिवर्तनाचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी रामायणाच्या माध्यमातून जगाला सत्य, त्याग आणि आदर्श जीवनाचा संदेश दिला, असे प्रतिपादन मराठी विषयाचे शिक्षक शिवाजी हसनेकर यांनी केले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महर्षी वाल्मीकी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापिका एम. बी. लगाडे होत्या.
यावेळी बोलताना शिवाजी हसनेकर म्हणाले की, रत्नाकर ऊर्फ वाल्या कोळी यांचे नारद मुनींच्या उपदेशामुळे झालेले परिवर्तन हा भारतीय संस्कृतीतील प्रेरणादायी प्रसंग आहे. पुढे त्यांनी संस्कृत साहित्यातील पहिले महाकाव्य मानल्या जाणाऱ्या रामायणाची रचना केली. त्यांच्या या महान साहित्यनिर्मितीमुळे त्यांना ‘आद्यकवी’ म्हणून गौरविण्यात येते. रामायणातील विचार आजही मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी मुख्याध्यापिका एम. बी. लगाडे यांनी महर्षी वाल्मीकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रकाश पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला, तर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. आर. तिरविर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी महर्षी वाल्मीकी यांच्या विचारांचा आदर्श घेऊन जीवनात चांगले कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला बी. व्ही. गुडगेनहट्टी, ए. एस. पाटील, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर एस. आर. पाटील यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta