Friday , November 6 2026
Breaking News

दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच

Spread the love

 

जनगणना सर्वेक्षणामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता फेटाळली; लवकरच अंतिम वेळापत्रक

बेळगाव : जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार सुरू असल्याची चर्चा असतानाच, या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेतल्या जाणार असल्याचे कर्नाटकचे शालेय शिक्षणमंत्री मधु बंगाराप्पा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याच्या चर्चेमुळे निर्माण झालेल्या संभ्रमातून दिलासा मिळाला आहे.

जनगणना संचालनालयाने पाठविलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर बोलताना बंगाराप्पा यांनी सांगितले की, एसएसएलसी (दहावी) आणि एचएसएलसी (बारावी) परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. त्यावर हरकती आणि सूचना नोंदविण्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. लवकरच परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नियोजनावर तसेच पुढील प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय सीईटी आणि नीटसारख्या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकासह महाविद्यालयीन प्रवेश आणि समुपदेशन प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परीक्षा नियोजित वेळेत घेण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाचा कालावधी परीक्षा कालावधीशी जुळत असल्याने परीक्षा वेळापत्रकात बदल करण्याची मागणी होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि पुढील प्रवेश प्रक्रियेचा विचार करून दहावी व बारावीच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *