


बेळगाव : केएलई संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाने (स्वायत्त), बेळगावने किट्टूर राणी चन्नम्मा विद्यापीठ, बेळगाव यांच्या वतीने आयोजित दहाव्या आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत सलग दहाव्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २३ ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विजापूर येथील कर्नाटक राज्य अक्कमहादेवी महिला विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत लिंगराज महाविद्यालयाने एकूण २१२ गुण मिळवून सर्वसाधारण विजेतेपदासह पुरुष आणि महिला संघांचे विजेतेपदही प्राप्त केले. महाविद्यालयाच्या खेळाडूंनी १९ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्य पदके जिंकली. याशिवाय तीन नवीन स्पर्धा विक्रम प्रस्थापित केले. वैभवी बाळू बुद्रुक हिने महिला वैयक्तिक विजेतेपद मिळवून महाविद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली.
पुरुष खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी
पुरुषांच्या उंच उडी आणि तिहेरी उडी प्रकारांत अरुणगौड चंद्रगौड मलागौडर याने प्रथम क्रमांक मिळवला. भुषण सुनील पाटील याने ४०० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम, तर १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकावला. श्रीनाथ गणपत दलवी याने २०० आणि ४०० मीटर धावण्याच्या शर्यतींत द्वितीय क्रमांक मिळवला. विरेश बी. कांबळे याने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तृतीय, तर ४०० मीटर अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळवला. संजय पाटील याने ११० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला.
मैदानी स्पर्धांमध्ये कल्लोळप्पा बांदिवड्डर याने गोळाफेकमध्ये प्रथम आणि भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. प्रज्वल हल्लोळी याने थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, तर गोळाफेकमध्ये चौथा क्रमांक मिळवला. केशव कांबळे याने थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. शुभम कुंडेकर याने भालाफेकमध्ये, तर अभिषेक बनाडे याने हातोडाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. शिवराज बाळासाहेब देसाई याने तिहेरी उडीमध्ये तृतीय आणि लांब उडीमध्ये चौथा क्रमांक मिळवला.
महिला खेळाडूंची मैदानावर चमकदार कामगिरी
महिलांच्या गटात वैभवी बाळू बुद्रुक हिने १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतींत प्रथम क्रमांक मिळवत नवीन स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला. या कामगिरीच्या जोरावर तिने महिला वैयक्तिक विजेतेपदही पटकावले. अपूर्वा आनंद नाईक हिने १०० मीटर धावणे आणि ४०० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला. स्वरा शिंदे हिने १०० मीटर धावणे आणि ४०० मीटर अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळवला, तर स्नेहा हुडेद हिने १०० मीटर अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक पटकावला.
स्पृहा राजू नाईक हिने थाळीफेक आणि हातोडाफेक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवला. थाळीफेकमध्ये तिने नवीन स्पर्धा विक्रम नोंदवला. स्मिता प्रमोद काकतकर हिने लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला, तर अनिता दड्डी हिने हेप्टॅथलॉनमध्ये प्रथम क्रमांक मिळवून नवीन स्पर्धा विक्रम प्रस्थापित केला.
रिले स्पर्धांमध्येही यश
रिले स्पर्धांमध्येही लिंगराज महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. पुरुषांच्या ४ × ४०० मीटर रिले संघात भुषण सुनील पाटील, विरश बी. कांबळे, श्रीनाथ गणपत दळवी आणि अंकित किणेकर यांचा समावेश होता. या संघाने प्रथम क्रमांक मिळवला.
महिलांच्या ४ × ४०० मीटर रिले संघात लक्ष्मी लक्ष्मण होसामणी, स्वरा शिंदे, अनिता दड्डी आणि प्रीती बसवराज हलबार यांचा समावेश होता. या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
मिश्र ४ × ४०० मीटर रिले स्पर्धेतही महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला. या संघात पुरुष गटातून भुषण सुनील पाटील आणि विरश बी. कांबळे, तर महिला गटातून वैभवी बाळू बुद्रुक आणि अपूर्वा आनंद नाईक यांचा समावेश होता.
व्यवस्थापनाकडून खेळाडूंचे अभिनंदन
खेळाडूंची मेहनत, शिस्त, जिद्द आणि उत्कृष्टतेसाठीची बांधिलकी यामुळे हे यश संपादन झाले. महाविद्यालयाचे व्यवस्थापन, प्राचार्य, प्राध्यापकवर्ग आणि क्रीडा विभागाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यांचाही या यशात महत्त्वाचा वाटा आहे.
केएलई संस्थेचे संचालक श्री. महांतेश कवटगीमठ, श्री. अनिल पट्टेद, सहसचिव डॉ. प्रकाश कटकोळ आणि सदस्य सचिव डॉ. सतीश एम. पी. यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. मेलिनमणी, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सी. रामाराव, संघ व्यवस्थापक प्रा . विनायक वरुटे, डॉ. अनुपकुमार जांबोटी आणि प्रा . सुनीत मुडलगी यांनी सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे, सहभागी खेळाडूंचे आणि क्रीडा संघाचे अभिनंदन केले. या यशामुळे लिंगराज महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta