Friday , November 6 2026
Breaking News

कवितांतून स्त्रीवेदनांचा हुंकार; रसिकांची मने हेलावली!

Spread the love

 

‘कवी समजून घेताना’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव : स्त्रीजीवनातील वेदना, स्त्रीभ्रूणहत्येचे वास्तव, पुरुषप्रधान व्यवस्थेतील विसंगती, शेतकरी कुटुंबाचा संघर्ष, पर्यावरणाचा ऱ्हास आणि प्रेमातील विरह अशा विविध विषयांना कवितेतून भिडत कवयित्री सीमा कणबरकर यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सामाजिक प्रश्नांवर परखड भाष्य करणाऱ्या आणि मानवी भावभावनांना संवेदनशीलपणे स्पर्श करणाऱ्या त्यांच्या कवितांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. आशयघन शब्दरचना, प्रभावी सादरीकरण आणि गेय कवितांना लाभलेली सुरेल स्वरांची जोड यामुळे त्यांची काव्यमैफल विशेष रंगली.

राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्यावतीने आयोजित ‘कवी समजून घेताना’ या उपक्रमांतर्गत कवयित्री सीमा कणबरकर यांच्या ‘आठवांच्या तळाशी’ या कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) रामदेव गल्ली येथील शहीद भगतसिंग सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध कवी मंडळ संघाचे उपाध्यक्ष बसवंत शहापूरकर होते. व्यासपीठावर संघाचे सचिव सुधाकर गावडे आणि गोव्याचे ख्यातनाम गझलकार दत्तप्रसाद जोग उपस्थित होते.

स्त्रीभ्रूणहत्येवर कवितेतून प्रहार

कणबरकर यांनी आपल्या काव्यसादरीकरणाची सुरुवात स्त्रीभ्रूणहत्येसारख्या गंभीर सामाजिक प्रश्नावर भाष्य करणाऱ्या ‘सावध व्हा’ या कवितेने केली. जन्माला येण्यापूर्वीच मुलींचे अस्तित्व संपविणाऱ्या विकृत मानसिकतेवर त्यांनी शब्दांचे प्रहार केले. स्त्रीजन्माचे असुरक्षित वास्तव मांडतानाच महिलांनी अन्यायाविरुद्ध सजग होऊन संघर्ष करण्याची गरजही अधोरेखित केली. कवितेतील आर्तता आणि विद्रोही स्वराने रसिकांना विचारप्रवृत्त केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन करणाऱ्या ‘इथे तुझ्यामुळे मी’ या गीतातून त्यांनी शिक्षणामुळे स्त्रीजीवनात घडलेला परिवर्तनाचा प्रवास उलगडला. चूल आणि मूल या चौकटीत अडकलेल्या स्त्रीला शिक्षणाने आत्मभान, स्वतंत्र अस्तित्व आणि आत्मविश्वास मिळवून दिला, हा आशय त्यांनी सुरेल आवाजात मांडला.

निसर्गाच्या ऱ्हासाबद्दल चिंतेचा सूर

‘चक्र बदललं’ या कवितेतून वाढते तापमान, आटलेल्या विहिरी, कोरड्या नद्या आणि भेगाळलेली जमीन यांचे चित्र उभे करत त्यांनी पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल चिंता व्यक्त केली. माणसाच्या वाढत्या हव्यासामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून त्याचे परिणाम संपूर्ण सृष्टीला भोगावे लागत आहेत, याची जाणीव करून देत त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

‘माय मराठीचा टिळा शोभे ललाटास जसा…’ या कवितेतून मराठी भाषेचा अभिमान, संतसाहित्याची समृद्ध परंपरा आणि मातृभाषेशी असलेले भावनिक नाते यांचा गौरव करण्यात आला. मराठी भाषेच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या या कवितेला रसिकांनी दाद दिली.

जुन्या आठवणींतून भावविश्वाचा वेध

‘जुने’ या कवितेत जुन्या घराच्या भिंती, करकरणारी दारे, माळ्यावरील पेटी, पोथीपुस्तके आणि काळाच्या ओघात दूर गेलेली माणसे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. जुन्या वास्तूंसोबतच नाती आणि आठवणीही काळाच्या प्रवाहात मागे पडत असल्याची हुरहूर या कवितेतून व्यक्त झाली.

‘नकोत मजला सात जन्म’ या कवितेतून त्यांनी स्त्रीजीवनातील अन्याय, शोषण आणि पुरुषप्रधान मानसिकतेवर परखड भाष्य केले. सीता, द्रौपदी, कुंती, देवकी, राधा आणि मीरा यांच्या जीवनातील दुःखाचा संदर्भ घेत स्त्रीच्या वाट्याला आलेल्या वेदनांचा वेध घेतला. सात जन्मांच्या नात्याची अपेक्षा करणाऱ्या समाजात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि सन्मानाचा प्रश्न मात्र दुर्लक्षित राहतो, ही विसंगती त्यांनी प्रभावीपणे मांडली. मुलाच्या जन्मासाठी आग्रही असलेल्या मानसिकतेवरही प्रश्न उपस्थित करत त्यांनी स्त्रीच्या अस्तित्वाचा मुद्दा ऐरणीवर आणला.

शेतकरी कुटुंबाच्या वेदनांना शब्द

‘आंदण’ या कवितेतून दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या दुःखाचे हृदयस्पर्शी चित्रण करण्यात आले. भेगाळलेली जमीन, आटलेल्या विहिरी, पोळणारा आईचा पदर आणि काळजात वेदना घेऊन जगणारा बाप यांच्या माध्यमातून शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा संघर्ष त्यांनी मांडला. निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देणाऱ्या शेतकरी आई-वडिलांच्या वेदनांनी रसिकांची मने हेलावून गेली.

सामाजिक आशयाच्या कवितांबरोबरच प्रेमभावनांचा तरल आविष्कारही त्यांच्या सादरीकरणात अनुभवायला मिळाला. ‘तू नसताना’ या गीतातून प्रिय व्यक्तीच्या अनुपस्थितीत जाणवणारी विरहाची हुरहूर, पाऊस, इंद्रधनुष्य आणि श्रावणातील निसर्गसौंदर्य यांची सुंदर गुंफण त्यांनी केली.

‘रोज सपनात येती’ या गीतातून चिंचा-आवळ्यांची चव, भातुकलीचे खेळ, शाळेची वाट, बालमैत्रिणींचा सहवास आणि माहेरच्या आठवणी जागवल्या. संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुरफटलेल्या स्त्रीच्या मनात दडलेली बालपणाची ओढ या गीतातून व्यक्त झाली. या सादरीकरणाने रसिकांनाही आपल्या आठवणींच्या विश्वात रमविले.

स्त्रीमनाच्या विविध छटा, सामाजिक प्रश्नांची जाणीव, निसर्गाविषयीची संवेदनशीलता आणि प्रेमभावनांची तरलता यांचा सुरेख संगम कणबरकर यांच्या कवितांमधून अनुभवायला मिळाला. आशयानुरूप आवाजातील चढउतार, प्रभावी शब्दफेक आणि गेय कवितांचे सुरेल सादरीकरण ही त्यांच्या काव्यवाचनाची वैशिष्ट्ये ठरली. प्रत्येक कवितेनंतर रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.

खुले कवी संमेलनही रंगले

कार्यक्रमाच्या प्रारंभी कवयित्री उर्मिला शहा यांनी स्वागत व प्रास्ताविक करत शब्दगंध कवी मंडळ संघाच्या साहित्यिक उपक्रमांची माहिती दिली. स्मिता किल्लेकर यांनी सीमा कणबरकर यांचा परिचय करून दिला. यावेळी कवयित्री सीमा कणबरकर आणि गझलकार दत्तप्रसाद जोग यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मुख्य कार्यक्रमापूर्वी आयोजित खुले कवी संमेलनही उत्साहात पार पडले. भरत गावडे, चंद्रशेखर गायकवाड, किरण पाटील, नेहा जोशी, अक्षता यल्लुरकर, नितीन आनंदाचे, प्रा. महादेव खोत, उर्मिला शहा, परशराम खेमणे, सुधाकर गावडे आणि बसवंत शहापूरकर यांनी विविध विषयांवरील कविता सादर केल्या. सामाजिक वास्तव, प्रेमभावना, मानवी नातेसंबंध आणि जीवनानुभव यांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांतून उमटले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव सुधाकर गावडे यांनी केले, तर परशराम खेमणे यांनी आभार मानले.

शब्दगंध कवी मंडळ संघाच्या या उपक्रमातून रसिकांना सीमा कणबरकर यांच्या काव्यविश्वाचा जवळून परिचय झाला. सामाजिक बांधिलकी आणि मानवी संवेदनांचा संगम घडविणाऱ्या या काव्यमैफलीने बेळगावच्या साहित्यविश्वात भावपूर्ण वातावरण निर्माण केले.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *