Friday , November 6 2026
Breaking News

सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राच्या विकासासाठी २१५ कोटींची योजना!

Spread the love

 

सहा हजार भाविकांसाठी अन्नदासोहाची सुविधा; धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘टेम्पल टुरिझम कॉरिडॉर’चा प्रस्ताव

बेळगाव : उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने २१५ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला प्रारंभ केला आहे. भाविकांसाठी आधुनिक सुविधा, सुलभ दर्शन व्यवस्था, भव्य अन्नदासोह संकुल आणि मंदिर परिसराचा नियोजनबद्ध विकास यावर या योजनेत भर देण्यात आला आहे. या विकासकामांमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक व्यवसाय आणि रोजगाराच्या संधीही वाढण्याची अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सोमवारी यल्लम्मा डोंगरावरील मंदिर परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन करून योजनेला गती दिली. मंदिराचा विकास आणि व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विशेष विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. पर्यटन विभाग, मुजराई विभाग, जिल्हा पर्यटन विकास समिती, श्री रेणुका यल्लम्मा मंदिर विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सहा हजार भाविकांसाठी अन्नदासोह

सौंदत्ती यल्लम्मा मंदिरात वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषतः यात्रेच्या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याने दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आधुनिक दर्शन रांग संकुल उभारण्यात येणार असून, भाविकांना उन्हात दीर्घकाळ उभे राहावे लागू नये, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महिला आणि दिव्यांग भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे, यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय, एकाच वेळी सुमारे सहा हजार भाविकांना बसून भोजन करता येईल, असे भव्य अन्नदासोह संकुल उभारण्याचे नियोजन आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणाऱ्या ‘मेवा दासोह’ व्यवस्थेलाही प्राधान्य दिले जाणार आहे.

धार्मिक पर्यटनाला नवी दिशा

यल्लम्मा देवीवरील श्रद्धा कर्नाटकापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून भाविक येथे दर्शनासाठी येतात. या क्षेत्राचे धार्मिक महत्त्व, ऐतिहासिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन करून परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राचा विकास केवळ मंदिरापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण परिसराला प्रमुख धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. मंदिरातील सोन्याच्या अलंकारांचा भाविकांना देवतेचे दर्शन अधिक आकर्षक व्हावे, यासाठी योग्य प्रकारे उपयोग करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणार?

बेळगाव जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळांना एकमेकांशी जोडण्यासाठी ‘टेम्पल टुरिझम कॉरिडॉर’ उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली. सौंदत्ती यल्लम्मा, चिंचली मायाक्का, कोकटणूर यल्लम्मा आणि सुळेभावी महालक्ष्मी या धार्मिक स्थळांना जोडल्यास उत्तर कर्नाटकातील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंदिर विकास प्राधिकरणासाठी मुजराई विभागाकडून ९७ कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. विकासकामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सौंदत्तीच्या विकासासाठी ४५ कोटी

सौंदत्ती नगरपालिकेच्या विकासासाठी ४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, १०० खाटांच्या रुग्णालयाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी तलाव भरण्याच्या योजना, शेतकऱ्यांसाठी विविध विकासकामे आणि युवकांना क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यावर सरकार भर देत असल्याचे मुख्यमंत्री शिवकुमार यांनी सांगितले.

शेतकरी, महिला आणि युवकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. तीन एकरांपर्यंत शेती असलेल्या गरीब शेतकऱ्यांसाठी मोफत ट्रॅक्टरद्वारे नांगरणीची ‘नेगिल योगी’ योजना राबविण्यात येत असून, मालमत्ता आणि जमीन नोंदींचे सुलभीकरण करण्यासाठी ‘आस्ती गॅरंटी’ आणि ‘भूमी गॅरंटी’ योजनांची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मंदिर विकास, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या पर्यटन प्रकल्पांच्या माध्यमातून सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राला नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, या विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी आणि ती निर्धारित वेळेत पूर्ण होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *