



बेळगाव : आपण कुठेही असलो तरी सीमाप्रश्नाचा लढा सक्रियपणे सुरूच राहील आणि संयुक्त महाराष्ट्र हेच आमचे अंतिम ध्येय आहे, याचा प्रत्यय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज दिला.
मागील काही दिवसांपासून समितीचे कार्यकर्ते सहपरिवार सहलीसाठी बाहेर गेले आहेत. आज प्रवासादरम्यान समृद्धी महामार्गावर थांबून त्यांनी बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या जोरदार घोषणा दिल्या. सहलीच्या निमित्ताने घराबाहेर असतानाही सीमाप्रश्नाच्या लढ्याप्रती असलेली आपली बांधिलकी त्यांनी या माध्यमातून व्यक्त केली.
‘जिथेही असू, तिथून लढ्यात सक्रिय असू’ हा संदेश देत सीमाभाग महाराष्ट्रात सामील होईपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचे ध्येय कायम असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे उपाध्यक्ष वासू सामजी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य अनिल पाटील, समितीचे नेते सुरेश राजुकर, जोतिबा मुतगेकर, सुनील पाटील, अनंत गरडे, राजाराम निलजकर, गंगाराम पावटे, सुभाष गवी, सखाराम पाटील, चाळोबा भांदुर्गे यांच्यासह अन्य समितीनिष्ठ सीमावासीय उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta