Sunday , November 22 2026
Breaking News

बेळगावात बुधवारी सहावे राज्यस्तरीय वृत्तपत्र वितरक संमेलन

Spread the love

 

राज्यभरातील वृत्तपत्र वितरकांची उपस्थिती; मान्यवरांची लाभणार उपस्थिती

बेळगाव : वाचकांपर्यंत दररोज वृत्तपत्र पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणाऱ्या वृत्तपत्र वितरकांच्या हक्कांना, समस्या आणि प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सहावे राज्यस्तरीय वृत्तपत्र वितरक संमेलन बेळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. कर्नाटक राज्य वृत्तपत्र वितरक महासंघ, न्यूज पेपर डिस्ट्रीब्यूटर चॅरिटेबल ट्रस्ट आणि बेळगाव वृत्तपत्र वितरक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ११ रोजी सकाळी ११ वाजता अशोकनगर येथील धर्मनाथ भवन येथे हे संमेलन होणार आहे. यामध्ये राज्याच्या विविध भागांतील वृत्तपत्र वितरक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या संमेलनाचे उद्घाटन माजी माध्यम सल्लागार के. व्ही. प्रभाकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार जगदीश शेट्टर, खासदार प्रियांका जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री तथा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार आसिफ सेठ आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

प्रमुख अतिथी म्हणून कर्नाटक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवानंद तकदूर, आयएफडब्ल्यूजेचे अध्यक्ष बी. व्ही. मल्लिकार्जुन, तुमकूर येथील प्रजा प्रगती वृत्तपत्राचे संपादक डॉ. एस. नागमणी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन तसेच तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकूर उपस्थित राहणार आहेत.

वृत्तपत्र क्षेत्रातील महत्त्वाचा दुवा असलेल्या वितरकांच्या योगदानाची दखल घेण्याबरोबरच त्यांच्या विविध समस्यांवर या संमेलनात सविस्तर चर्चा केली जाणार आहे. वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील अडचणी, वितरकांचे प्रश्न, त्यांचे हक्क आणि भविष्यातील आव्हाने यावर विचारमंथन होणार आहे.

विशेष म्हणजे, यंदा प्रथमच या राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन बेळगावमध्ये करण्यात येत आहे. त्यामुळे बेळगावच्या वृत्तपत्र वितरण क्षेत्रासाठी हा महत्त्वपूर्ण क्षण मानला जात आहे. या संमेलनात बेळगावमधील सर्व वृत्तपत्र वितरकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाध्यक्ष प्रताप भोसले यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *