Sunday , November 22 2026
Breaking News

गृहलक्ष्मीच्या पैशांसाठी नातवाने घेतला आजीचा जीव!

Spread the love

 

मृतदेह दोन गोण्यांत भरून जलाशयात फेकला; गुन्हा लपविण्यास मदत केल्याप्रकरणी वडिलांनाही अटक

बेळगाव : पैशांचा हव्यास माणसाला किती निर्दयी बनवू शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय हुक्केरी तालुक्यातील अरळीकट्टी गावात आला आहे. गृहलक्ष्मी योजनेतून मिळणाऱ्या पैशांतील वाट्यावरून झालेल्या वादातून एका २० वर्षीय नातवाने स्वतःच्या ७८ वर्षीय आजीची निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे, तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आजीचा मृतदेह दोन गोण्यांत भरून त्याला मोठे दगड बांधत जलाशयात फेकून दिला. या प्रकरणात आरोपीला मदत केल्याच्या आरोपावरून त्याच्या वडिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या अमानुष घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आठवडाभर बेपत्ता, अखेर जलाशयात सापडला मृतदेह!

हम्मन्ना बालप्पा सनदी (वय ७८) या १० नोव्हेंबर रोजी पाश्चापूर येथील आठवडी बाजारात जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. नातेवाईक, परिचित तसेच परिसरात शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जीनराळ गावाजवळील घटप्रभा नदीच्या धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दोन गोण्यांत भरलेला मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे या गोण्यांना मोठे दगड बांधण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आणि तपासाची चक्रे गतिमान केली.

गृहलक्ष्मीच्या पैशांसाठी आजीशी वारंवार वाद!

जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या हत्येप्रकरणी मृत महिलेचा २० वर्षीय नातू भीमप्पा रामप्पा सनदी याला अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आजीला गृहलक्ष्मी योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक लाभातील हिस्सा आपल्यालाही मिळावा, अशी मागणी भीमप्पा गेल्या काही वर्षांपासून करत होता. मात्र, आजीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होते. याच आर्थिक वादातून अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

१० नोव्हेंबर रोजी भीमप्पा याने आजीला दुचाकीवरून गवी सिद्धेश्वर डोंगरावर नेले. तेथे पुन्हा गृहलक्ष्मी योजनेच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. आजीने पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या नातवाने तिला खाली ढकलले. त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली.

२,३०० रुपये आणि सोन्याच्या साखळ्याही लुटल्या!

हत्येनंतर गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले. त्यासाठी मृतदेह डोंगरावरच सोडून तो पाश्चापूर येथे गेला आणि दोन गोण्या घेऊन परतला. आजीजवळ असलेले २ हजार ३०० रुपये त्याने काढून घेतले. त्यानंतर मृतदेह दोन्ही गोण्यांमध्ये भरला.

रात्रीच्या वेळी दुचाकीवरून मृतदेह जीनराळ गावाजवळील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये नेण्यात आला. आजीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्याही आरोपीने काढून घेतल्या. त्यानंतर गोण्यांमध्ये मोठे दगड भरून त्या पाण्यात फेकून दिल्या, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

या प्रकरणात आरोपीच्या वडिलांनीही गुन्हा लपविण्यास मदत केल्याचा आरोप असून, पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; चौघांना अटक

Spread the love  ९,८०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त बेळगाव : शहरातील अवैध मटका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *